अकोला : डिजिटल युग हा तंत्रज्ञानावर आधारित काळ. यामध्ये मानसिक ताणतणावात झपाट्याने वाढ झाली. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हिंसक वृत्ती बळावली. राग अनावर होणे, संपत्तीचे वाद, विकृत मानसिकता यातून घडणाऱ्या गुन्हेगारीचा चढता आलेख दिसून येतो. संघटित किंवा कुख्यात गुंडांकडून होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा पांढरपेशा समाजातील व्यक्तींकडून होणारी गुन्हेगारी अधिक फोफावली. तरुणाईचा गुन्हेगारीकडे वाढता ओढा, व्यसनाधीनता, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, झटपट पैसा कमविण्याची हाव आदींमधून सातत्याने गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारीच्या विळख्यातून सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याचे चिन्ह आहेत.
गंभीर गुन्ह्यांसाठी अकोला चर्चेत
गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यासाठी अकोला जिल्हा राज्यात चर्चेत आला. किरकोळ वादातून हत्याकांड सारख्या गंभीर घटना समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करतात. पूर्ववैमनस्य, जमिनीचे वाद, कौटुंबिक कलह किंवा मानसिक तणावातून अशा दुर्दैवी घटना सातत्याने घडत आहेत. संपत्तीच्या वादातून निंबी मालोकार येथे गोळीबार करून एकाची निर्घृण हत्या झाली. जखमी असल्याचे लक्षात येताच मारेकऱ्यांनी पुन्हा घटनास्थळ गाठत मरेपर्यंत गोळीबार केल्याचा ‘सिनेस्टाईल’ थरारक प्रकार घडला. उधारीच्या कारणावरून तरुणावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. महान गावामध्ये आदिवासी दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीला वादाचे गालबोट लागले. किरकोळ वादानंतर संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला. अखेर जीव वाचवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाला एका घराचा आधार घ्यावा लागला. या प्रकरणात पोलिसांनी विनाकारण लाठीमार केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींना गजाआड केले तरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला, हे नाकारून चालणार नाही.
महिला अत्याचाराच्या घटनांमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
शरीर सुखासाठी विकृत मानसिकता वाढत चालली आहे. त्यातून मुली, तरुणी व महिलांसाठी वातावरण असुरक्षित झाले. शहरात सुताराने छुपे कॅमेरे लावून महिलांच्या अश्लील चित्रफित तयार करीत शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून पोलीस देखील मागे नसल्याचे विविध घटनांवरून स्पष्ट होते. बाळापूरमध्ये चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केले. लग्नाला नकार दिल्याने तरुणीने आपले आयुष्य संपवल्याचा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणात पोलीस दलाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या त्या नराधमाला गजाआड करण्यात पथकाची चांगलीच दमछाक झाली. या अगोदर देखील कोठडीतील महिलेकडे शरीर सुखाची मागणीसह शहर कोतवाली, चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत खाकी वर्दीतील ‘क्रूरकर्मा’ उघड झाले. रक्षकच भक्षक झाले, तर सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी कुणाकडे बघावे? असा प्रश्न निर्माण होतो. विकृत मानसिकता बदलण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी, जनमानसामध्ये व्यापक जनजागृती, सामाजिक आणि सुरक्षित वातावरण निर्मितीची गरज आहे.
शस्त्रांच्या तस्करीचे केंद्र?
बिश्नोई टोळीकडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना खंडणीसाठी धमक्या आल्या आहेत. त्यानंतर लोकप्रतिनिधींना सुरक्षा व्यवस्था पुरवली. बिश्नोई टोळीतील हस्तक शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावाचा रहिवासी होता. शस्त्र तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई देखील केली होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी वर्तुळात त्याचे नाव चर्चेत असते. लोकप्रतिनिधींच्या धमकी प्रकरणात अकोला पोलिसांच्या तपासाच्या तपासाची चक्रे नेमकी कुठे फिरली? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
अकोला हे मध्यवर्ती ठिकाण असून जंक्शन रेल्वेस्थानक व मध्य प्रदेशची सीमा जोडलेली आहे. शस्त्र तस्करी सारखे प्रकार जिल्ह्यातून होत असल्याचे अनेक वेळा पोलीस कारवाईतूनच समोर आले. निंबी मोलाकार येथील हत्या प्रकरणात बंदूक व गोळ्यांचा वापर झाला. आरोपींपर्यंत प्राणघातक शस्त्र पोहोचले कसे? असा प्रश्न असून पोलिसांचे त्यावर नियंत्रण नसल्याचे अधोरेखित होते.
प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा, त्यातही बनावट निर्मिती
राज्यात गुटखा बंदी आहे. तरीही सर्वत्र सर्रासपणे गुटखा आढळून येतो. गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. प्रतिबंधित गुटख्यावर नियंत्रण मिळवणे अपेक्षित असतांना अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत निकृष्ट आणि घातक रासायनिक घटकांचा वापर करून बनावट गुटखा निर्मिती केली जात असल्याचा कारखानाच समोर आला. पोलीस व अन्न-औषध प्रशासन विभागाने धाडसत्र राबवून लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी शर्मा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अटकपूर्व जामिनीसाठी आरोपीची धडपड सुरू आह. या आरोपीचे काही पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र समाज माध्यमांवर सार्वत्रिक झाले. आरोपीचे पोलिसांसोबतच ‘मधूर’ संबंध सर्वसामान्यांपासून काही लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे तपासाभोवतीच संशयाचे धुके दाट झाले.
अत्याधुनिकतेसोबतच गुन्हेगारीवर नियंत्रण आवश्यक
गेल्या काही महिन्यांपासून अकोला पोलीस दलाला अत्याधुनिक स्वरूप देण्याचे विशेष प्रयत्न झाले. त्यातून अकोला पोलीस दलाने सीसीटीएनएस प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. डायल ११२ मध्ये प्रतिसाद देण्यात अकोला पोलीस राज्यात अव्वल ठरले. संघटित गुन्हेगारी व टोळीयुद्धाचा विमोड करण्यासाठी कठोर कायद्याचा वापर करून कुख्यातांना हद्दपार केले. त्याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून आला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात झालेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे, यात कुठलेही दुमत नाही. आता हत्याकांड, चोरी, अपघात, फसवणूक, महिलांवरील अत्याचार आदी घटनांही रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
