अकोला : देहविक्री व्यवसायात विदेशी महिलेचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला. उच्चभ्रू ग्राहकांसाठी ‘हायप्रोफाइल’ देहविक्री व्यवसाय चालवला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून विदेशी महिलेसह तीन महिला व एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदनिकेत व्यवसाय
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली. उच्चभ्रू वस्तीतील हाय-प्रोफाईल देहविक्री व्यवसायाचा भंडाफोड केला. गोरक्षण मार्गालगत एका अपार्टमेंटमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. सदनिकेत हा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले. उच्चभ्रू ग्राहकांना लक्ष्य करून तळमजल्यावरील देहविक्रीचे जाळे चालवले जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
छापेमारीदरम्यान दस्तऐवज आणि साहित्य जप्त
रॅकेटमध्ये परदेशी महिलांचा समावेश आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. छापेमारीदरम्यान घटनास्थळावरून काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि साहित्य जप्त करण्यात आले. या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि मनोज केदारे यांच्या पथकाने केली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे. उच्चभ्रू वस्तीतील हाय-प्रोफाईल देहविक्री व्यवसायासाठी विदेशी महिला वापर होत असल्याच्या गंभीर प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अत्याचार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा
अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.डी. क्षीरसागर यांनी आज हा निकाल दिला.
आरोपी प्रल्हाद उत्तम हजारे (वय ३३ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. कासमार ता. बार्शिटाकळी जि. अकोला) याने पिंजर पोलीस ठाण्यांतर्गत ०९ जुलै २०१७ रोजी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला विनयभंग करून लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. न्यायालयाने आरोपीला भा.द. वि. कलम ३५४ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद तसेच पोक्सो कायद्याचे कलम ८, १० अंतर्गत दोषी ठरवून पाच वर्ष सक्तमजुरी व एक हजार दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
