अकोला : वडील व आठ वर्षीय मुलामध्ये वाद सुरू होता. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी आई गेली. त्यावर संतापाच्या भरात पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या पत्नीला पतीच रुग्णालयात देखील घेऊन गेला. मात्र, गंभीर जखमी पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बोरगांव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत यावलखेड येथे गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. वृषाली निंबोकार असे मृत पत्नीचे नाव आहे, तर अनिल निंबोकार असे आरोपी पतीचे नाव आहे. या थरारक घटनेने अकोला शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आठ वर्षीय मुलगा व वडिलांमध्ये सुरू होता वाद

बोरगावमंजू पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या यावलखेड येथे आज सकाळी अनिल निंबोकार व त्याच्या आठ वर्षांच्या मुलामध्ये वाद सुरू होता. या वादातून अनिल निंबोकार हा घरात मुलाला मारत होता. मुलाची आई वृषाली यांना ते सहन झाले नाही. त्या दोघांच्या वादात मध्ये पडल्या. मुलाला वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न होते. संतप्त पतीला हे आवडले नाही.

रागाच्या भरात पत्नीवर गंभीर वार

पतीचा राग अनावर झाला. त्याने धारदार शास्त्राने पत्नीच्या पोटात गंभीर वार केले. त्यामुळे पत्नी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. पती घाबरला. या अवस्थेत घटनेनंतर आरोपीने स्वतः गंभीर जखमी पत्नीला घेऊन रुग्णालयात दाखल झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून पत्नीला मृत घोषित केले. त्यानंतर आरोपी स्वतः स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांपुढे हजर झाला. त्याने घडलेला घटनाक्रम सांगून गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी अनिल हा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे. या थरारक घटनेमुळे शहर चांगलेच हादरले असून आरोपीविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दोन मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवले

वडील व मुलाच्या वादात पडल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केली. त्या दाम्पत्याला दोन चिमुकली मुले आहेत. या घटनेमध्ये आईचा जीव गेला, तर वडील गजाआड झाले. या धक्कादायक घटनेत शाळकरी दोन्ही मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरवले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.