अकोला : घर नावावर करण्याच्या वादातून चुलत भावानेच दारूच्या नशेत चाकूने भावाची निर्घृण हत्या केली. ही घटना शहरातील अकोट फाईल पोलीस ठाण्यांतर्गत दुबेवाडी परिसरात बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आरोपीला दोन तासात गजाआड केले आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

आरोपी रितीक अनिल बिहुणे व त्याचा चुलत भाऊ मृतक विनीत विजय बिहुणे हे दुबेवाडी येथे राहत होते. आरोपीला दारूचे व्यसन आहे. नशेमध्ये तो नेहमीच वाद घालत होता. विनीत यांच्या नावावर असलेले घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी आरोपी धमक्या देत होता. दरम्यान, बुधवारी रात्री परिसरात लहान मुले होळी सणानिमित्य रंग खेळत असतांना आरोपी रितीक बिहुणे त्या ठिकाणी दारू पिऊन आला. त्याने वाद घातला आणि अंगावर धावून गेला. आरोपीने रागाच्या भरात विनीत यांच्यावर चाकूने हल्ला केला. घर नावावर का करत नाही? या कारणावरून रितीक बिहुणे याने विनित बिहुणे यांच्या छातीवर चाकू मारून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी अकोट फाईल पोलीस ठाण्यात कलम १०३ (१), ३ (५) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.

आरोपी भोपाळला फरार होण्याच्या प्रयत्नात, मात्र पोलिसांनी…

हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिलेल्या सूचनेनुसार तपासासाठी विशेष पोलीस पथक गठीत करण्यात आले. आरोपीचा शोध घेतला जात होता. दरम्यान, आरोपी हा भोपाळ येथे राहणाऱ्या मावशीकडे जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर दाखल झाला. पोलिसांना याची माहिती मिळाली. पथकाने आरोपीला रेल्वेस्थानक परिसरातून अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अकोट फाइल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख रहीम, एएसआय अनिस पठाण, पो.हवा. संतोष चिंचोळकर, पो.हवा. योगेश काटकर, पो.कॉ. लिलाधर खंडारे, पो.का. गिरीश तिडके यांनी केली.