अकोला : चलनामध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा चालवणारी टोळी सक्रिय आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच अकोला स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणावरून तीन आरोपींना शनिवारी अटक केली. आरोपींकडून ५०० रुपयांच्या १९४ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून त्या नोटा बाजारपेठेत चालवण्यासाठी आणल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली.

नेमकं प्रकरण काय?

बाजारपेठेमध्ये एक व्यक्ती स्वतः जवळील बनावट नोटा खऱ्या नोटा असल्याचा बनाव करून चलनात आणत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना मिळाली. या माहितीवरून पथकाने मोठ्या शिताफीने गुडधी परिसरात सापळा रचून चंदन भिमराव धांडोरे (वय ४३ वषे रा.गुडधी ता.जि. अकोला) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या २१ नोटा आढळून आल्या. त्याची तपासणी केल्यावर भारतीय चलनाच्या नकली बनावट नोटा असल्याचे निष्पन्न झाले. या बनावट नोटा कोणाकडून आणल्या याची चौकशी करण्यात आली.

बनावट नोटांचे मूर्तिजापूर व गुडधी ‘कनेक्शन’

त्या नोटा मूर्तिजापूर येथील जहीरोद्दीन जबीरोददीन (रा. पठाणपूरा, मुर्तिजापूर जि. अकोला) याच्याकडून आणल्याचे आरोपीने सांगितले. त्यावर पथकाने तत्काळ मूर्तिजापूर गाठून आसरा फाटा चौकातून त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या एकूण १७३ नोटा आढळून आल्या. या नोटा कुठून मिळवल्या याची विचारणा केल्यावर त्याने गुडधी येथील विठ्ठल वारोकार याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पथकाने गुडधी येथून त्याला देखील ताब्यात घेऊन विचारपुस केली.

बनावट नोटांचे बुलढाणा जिल्हा मोठे केंद्र

बनावट नोटा बाजारपेठेत चलनात आणण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथून एका व्यक्तीकडून आणल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी चंदन भिमराव घांडोरे, जहीरोद्दीन जबिरोददीन व विठ्ठल संजय वारोकार यांना ताब्यात घेऊन सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीताचे कलम १८०, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा सखोल तपास सुरू आहे.

सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न

बाजारपेठेमध्ये बनावट नोटा चलनात आणून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचा टोळीचा प्रयत्न होता. त्यासाठी या बनावट नोटा वेगवेगळ्या व्यक्तींकडे देण्यात आल्या होत्या. या प्रकरणात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.