अकोला : ‘धुरंदर २’ चित्रपट पाहून आलेल्या अल्पवयीन नशेखोर मुलांच्या टोळीने कौलखेड भागात सशस्त्र धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सायंकाळी घडला.
ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यातील दोघांचे प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींची धरपकड सुरू केली. दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
चित्रपट बघून आल्यानंतर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
चित्रपटात दाखवलेल्या दृश्यानुसार त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न नव्या पिढीकडून केला जातो. यातूनच अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील घडतात. सध्या ‘धुरंदर टू’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तरुणाईचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट बघून आल्यानंतर उत्साहाच्या भरात चार ते पाच जणांच्या अल्पवयीन टोळीने सशस्त्र हल्ला केल्याचा गंभीर प्रकार अकोला शहरात घडला.
कौलखेड भागातील श्रद्धानगर तीनमध्ये नशेखोर टोळीने धुमाकूळ घातला. या टोळीने तीन जणांना चाकू मारत जखमी केले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. धुरंदर २ चित्रपट बघून आल्यानंतर नशेखोर युवकांची परिसरात चाकू आणि पाईपच्या बळावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाकू आणि लोखंडी पाईपने हल्ला
श्रद्धा नगर तीन येथे अभिलाष अरविंद हिंगे (वय ३२) यांच्यावर चाकू आणि लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जात आहे. कौलखेड चौकात रवि उर्फ छोटू ठाकरे (वय २४) याच्यावरही त्याच टोळीने हल्ला करुन जखमी केले. हरिभाऊ रोडे हा तरुण देखील जखमी झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
जुन्या वादातून घटना; तीन गंभीर गुन्हे
या सशस्त्र हल्ल्याची माहिती मिळताच खदान पोलीस आणि एलसीबीचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू केली. दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असून तीन गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर कौलखेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
