अकोला : राज्यात नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असतांनाच आता अकोला जिल्ह्यातून सुद्धा नराधम वृद्धाने चिमुकलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ६० वर्षीय वृद्धाची शेजारीच राहणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीवर वाईट नजर होती. मुलीचे आई-वडील मजुरीवर गेल्यानंतर नराधमाने चिमुकल्या मुलीवर चार ते पाच दिवस सातत्याने अत्याचार केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली आहेत.

चिमुकलीवर वारंवार अत्याचार

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात एका ६० वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करण्यासाठी गेल्यानंतर शेजारच्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पीडित मुलीच्या मनात भीती, अखेर तिने…

या अत्याचाराच्या प्रकारामुळे पीडित चिमुकलीच्या मनात भीती होती. तिने घडलेला प्रकार सुरुवातीलाच कुणालाच सांगितला नव्हता. मात्र, सातत्याने होणारा अत्याचार तिला असह्य झाला. अखेर काल पीडित मुलीने अत्याचाराचा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. हा प्रकार कळताच पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ पीडित मुलीला घेऊन चान्नी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल करण्यात आल्यावर आरोपी वृद्धावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके गठीत केली आहेत. आरोपींच्या शोधासाठी ते रवाना झाले आहेत.

अल्पवयीन मुली घरातही असुरक्षित

पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई-वडील कामावर गेल्यानंतर चिमुकली मुलगी घरात एकटीच होती. हीच संधी साधून शेजारी राहणाऱ्या वृद्धाने चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केला. भीतीमुळे मुलीने अगोदर काहीही सांगितले नव्हते. आई-वडिलांनी विश्वासात घेतल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार कथन केला. अल्पवयीन मुली आता आपल्या स्वत:च्या घरातही असुरक्षित झाल्या आहेत. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून नराधम आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.