अकोला : विविध भागात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा तब्बल ७०० कि.मी. माग घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत पाच पोलीस ठाण्यांमधील एकूण १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. १२ लाख सहा हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ९५ ग्रॅम सोन्याची लगड आणि दुचाकीचा समावेश आहे.

नेमकं घडलं काय?

हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ जून रोजी एका घराचे दार तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना जिल्ह्यातील हिवरखेड, तेल्हारा, बाळापूर, पातूर आणि चान्नी परिसरात अशाच प्रकारच्या घरफोड्या झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हे उघडकीस आणून आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.

१८५ सीसीटीव्ही फुटेज तपासले

पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अकोला शहरासह वेगवेगळ्या ठिकाणचे १८५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्तमाहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान पोलीस पथकाने बुलढाणा, जळगाव खांदेश तसेच मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर, इच्छापूर आणि नेपानगर परिसरात सुमारे ७०० किलोमीटरचा प्रवास केला. अखेर आरोपी दौलतखान गफारखान (२१, रा. केरपानी, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याचा ठावठिकाणा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला नेपानगर येथे ताब्यात घेतले.

इतर साथीदाराचा समावेश, सोनाराला विकले चोरलेले सोने

चौकशीदरम्यान आरोपीने साथीदार दुसेनखान करीमखान, (रा. केरपानी, मध्य प्रदेश) याच्यासह अकोला जिल्ह्यातील हिवरखेड, तेल्हारा, बाळापूर, पातूर आणि चान्नी परिसरात १० घरफोड्या केल्याची माहिती दिली. चोरी केलेल्या सोन्यापैकी काही मुद्देमाल मध्य प्रदेशातील नेपानगर येथील गोपाल कालुराम सोनी याच्याकडे विकल्याचेही तपासात समोर आले. पोलिसांनी गोपाल सोनी याच्याकडून चोरीच्या सोन्यापासून तयार केलेली अंदाजे ९५ ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली. सोन्याची अंदाजे किंमत १० लाख ८६ हजार २३० रुपये, तर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीची आहे. एकूण १२ लाख ६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

हिवरखेडसह विविध पोलीस ठाण्यांतर्गत घरफोडी

या कारवाईमुळे हिवरखेड पोलीस ठाण्यातील पाच, चान्नी पोलिस ठाण्यातील दोन, तर तेल्हारा, बाळापूर आणि पातूर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर तसेच अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.