अकोला : शेजारी राहणाऱ्याची पैसा व दागिन्यांवर वाईट नजर पडली. त्याने कुलूप मागून बनावट चावी बनवून घेतली. शेजारी बाहेर गावी जाताच आरोपीने त्यांची सदनिका उघडून पैसे व दागिन्यांवर हातसाफ केला. दागिने ज्वेलर्समध्ये विकले देखील. पोलिसांना मात्र चौकशीत संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच घरफोडी प्रकरणात आरोपी शेजाऱ्याने कबुली दिली. शहरातील तुकाराम चौकातील एका अपार्टमेंटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

नेमकी घटना काय?

शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत तुकाराम चौकातील एमराल्ड टॉवर येथील रहिवासी फिर्यादी सुधीर वसंतराव धंद्रेते हे सहपरिवार बाहेरगावी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रकमेची चोरी केली. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कुलूप मागून बनवून घेतली बनावट चावी

या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या संशयितास ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. विनोद रमेशराव कोहर (वय ५१ वर्षे, रा. एमराल्ड टॉवर, तुकाराम चौक, अकोला) याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने शेजारी राहणाऱ्या फिर्यादीच्या दाराचे कुलूप मागून ते बाजारात नेले. त्याची बनावट चावी बनवून घेतली. फिर्यादी सहपरिवार बाहेरगावी गेल्यावर बनावट चावीने घर उघडून डाव साधला.

चोरीचे दागिने विकले ज्वेलर्सला

कठोर चौकशीअंती आरोपीने चोरीचे सोन्याचे दागिने शहरातील नीलरत्न ज्वेलर्सचे संचालक सुशील राजेशकुमार शहा यांना विकल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. तीन लाख ५० हजार रुपये किंमतीची ४१.०१० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, आरोपीकडून चोरीच्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेली रोख रक्कम एक लाख ५० हजार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी, जप्त मुद्देमाल व तपासाची मूळ कागदपत्रे पुढील कारवाईसाठी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी.चंद्रशेखर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. शेजाऱ्याने विश्वासघात करून घरफोडी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.