अकोला : परिवारातील शेतीच्या वादातून चुलत भावांनीच गोळीबार करून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात उघडकीस आला. पहिल्या प्रयत्नात गोळ्या लागून जखमी झाल्याचे लक्षात घेताच आरोपींनी पुन्हा घटनास्थळ गाठून मरेपर्यंत गोळीबार केल्याचा थरारक प्रकार घडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून एकूण पाच आरोपींच्या मुसक्या आवळ्या आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.
नेमकं प्रकरण काय?
निंबी मालोकार येथील शेत शिवारात अमोल गजानन मालोकार यांना शेतामध्ये त्यांचे चुलत भाऊ अजय मालोकार, विजय मालोकार व त्यांचे इतर साथीदारांनी शेतरस्त्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून अमोल मालोकार यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याची माहिती मृतकाचे भाऊ उमेश मालोकार यांनी पोलिसांना दिली.
घटनास्थळ गाठून आरोपींकडून पुन्हा गोळीबार
पहिल्यांदा केलेल्या गोळीबारामध्ये केवळ जखमी झाल्याचे लक्षात घेताच आरोपींनी घटनास्थळ गाठत मृतकावर पुन्हा गोळीबार केला, असे ज्ञानेश्वर मालोकार यांनी पोलिसांना सांगितले. आरोपी विजय मालोकार याने हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांना माहिती देण्याचा बनाव करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, पोलिसांनी तो डाव उधळून लावला.
सापळा रचून पोलिसांकडून आरोपींचा पाठलाग
घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, जुने शहरचे पितांबर जाधव, बाळापूर प्रकाश झोडगे यांनी भेट दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके रवाना झाले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीवरून फरार होण्याच्या तयारीत असलेले विजय मालोकार, विजय बुटे व एक विधी संघर्षग्रस्त बालकाला उमरी परिसरातून सापळा रचत ताब्यात घेतले. अजय श्रीकृष्ण मालोकार व त्याचा साथीदार राजकुमार शिवचरण मालोकार हे छ. संभाजीनगरकडे पळून जात असल्याचे कळताच पथकाने आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना देउळगाव येथे मध्यरात्री मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
बालकासह पाच जण ताब्यात
हत्या प्रकरणात विजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३३ वर्षे रा.निंबी मालोकार ह.मु. उमरी, अकोला), अजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३२ वर्षे रा.निंबी मालोकार ह.मु. उमरी, अकोला), राजकुमार शिवचरण मालोकार (वय २५ वर्षे रा निंबी मालोकार), विजय कैलास बुटे (वय ३० वर्षे रा. कावसा ता अकोट ह.मु. मोठी उमरी जि. अकोला) व विधी संघर्षग्रस्त बालक या पाच आरोपींना अटक केली. आरोपींकडून दोन चारचाकी, एक दुचाकी, पाच मोबाइल व रोख एक लाख सात हजार ७६० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून आरोपींना पुढील तपासासाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
