अकोला : भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घर मालकाच्या मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. पोलीस कर्मचाऱ्याने नंतर लग्नाला नकार दिल्याने पीडितेने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या ४२ दिवसांपासून कोमात असलेल्या पीडित तरुणीचा शनिवारी मृत्यू झाला. तीची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन १३ दिवस झाले तरी संबंधित नराधम पोलीस अद्यापही फरारच आहे. या प्रकरणी जनमानसातून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

पीडित तरुणीच्या वडिलांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणारा पोलीस कर्मचारी पवन उद्धवराव वडगावे याने त्यांच्या मुलीशी लग्न करण्याचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. या घटनेमुळे तरुणीला मोठा मानसिक धक्का बसला. तरुणी तणावाखाली आहे. नैराश्यातून पीडित तरुणीने १३ जून २०२६ रोजी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तत्काळ तिला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. अकोल्यात तरुणीवर उपचार करण्यात आले. विविध रुग्णालयामध्ये पीडित तरुणीवर उपचार झाले. त्यानंतर पीडित तरुणी कोमात गेली. गेल्या ४२ दिवसांपासून ती मृत्युशी झुंज देत होती. अखेर शनिवारी तीची प्राणज्योत मालवली.

‘मोबाइल चॅट’वरून अत्याचाराचा प्रकार उघड

पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तीचा ‘मोबाइल लॉक’ होता. मोठ्या प्रयत्नानंतर ११ जुलैला मोबाइल उघडण्यात यश झाले. त्यामध्ये पीडित तरुणी व आरोपी पोलीस कर्मचाऱ्यामधील चॅट पाहून पीडितेच्या कुटुंबाला धक्काच बसला. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे त्या चॅटवरून दिसून आले. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

१३ दिवसांपासून आरोपी पोलिसाचा थांगपत्ता लागेना

१२ जुलै रोजी तक्रार दाखल होत असल्याचे कळताच आरोपी पोलीस कर्मचारी सुट्टी टाकून फरार झाला. आरोपीच्या मूळ गावी पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली. मात्र, आरोपी मिळून आला नाही. अद्याप बाळापूर पोलिसांना आरोपाचा शोध लावता आलेला नाही. या प्रकरणामुळे संतापाची भावना असून बाळापूर येथील नागरिकांनी मोर्चा काढत आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे.