अकोला : भिन्नधर्मीय दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, त्या प्रेमविवाहाचा थरारक शेवट झाला आहे. पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. सततच्या वादाला कंटाळून पतीने हे क्रूर पाऊल उचलले. पोलीस तपासात या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला. हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांसह हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. यात अनेक आरोपी असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे.

जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

शहरातील डाबकीरोड पोलीस ठाण्यांतर्गत अन्नपुर्णा माता मंदिराचे बाजूला महिलेचा अर्थवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह ६ एप्रिलला आढळून आला. चेहरा जळलेला असल्याने ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, डाबकी रोडचे पोलीस निरीक्षक दीपक कोळी यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी पथके गठीत केले.

आरोपी पोलीस ठाण्यात हजर, गुन्ह्याची कबुली

परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. शहरातील बेपत्ता महिलांची घेण्यात आली. तरीही मृतक महिलेची कोणतीही माहिती मिळत नव्हती. दरम्यान, आरोपी सादिक शहा तसरीफ शहा (वय २९ वर्ष रा. नांदखेडा, ता. मंगरूळपीर जि. वाशीम) याने पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नी रविना मोहन पवार (वय २४ वर्ष) हिच्यासोबत वाद झाल्याने हत्या केल्याची कबुली दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे सांगितले.

प्रेमविवाह, महिलेचे दुसरे लग्न अन् सतत वाद

आरोपी आणि मृतक महिलेचा प्रेमविवाह होता. रविना मोहन पवार हिचे हे दुसरे लग्न होते. त्यांच्यात सतत वाद होत होते. घटनेच्या रात्री रागाच्या भरात आरोपी सादिक शहा याने पत्नीची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घटनास्थळावर आणून जाळल्याची कबुली आरोपीने दिली. पुढील तपास डाबकीरोड पोलीस करीत आहे.

‘लव जिहाद’चा आरोप

दरम्यान, या प्रकरणामुळे जनसामान्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे. हे ‘लव जिहाद’चे प्रकरण असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला. ही हत्या करणे एकट्या व्यक्तीकडून शक्य नाही. यामध्ये इतरही आरोपींचा सहभाग असू शकतो, असे मृतक महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.