अकोला : शेतीच्या वादातून तरुणाच्या डोळ्यात मिर्ची पावडरचे पाणी टाकत डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे निंबी येथे घडली. या प्रकरणी फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

नेमकी घटना काय?

बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी येथे अनिकेत भास्कर इंगळे (वय २७ वर्ष) यांच्यावर आरोपींनी शेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला केला. अगोदर मिर्ची पावडरचे पाणी आरोपींनी मृतकाच्या डोळ्यात फेकले. त्यानंतर हातोड्याने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. प्राथना भास्कर इंगळे यांच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

पथकांकडून संयुक्त शोध मोहीम

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर व बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांना गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ पकडण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा व बार्शीटाकळी पोलिसांची संयुक्त पथके तयार करण्यात आले. पथकाने व्यापक शोध मोहीम राबवली. पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील आरोपींचे संभाव्य लपण्याच्या ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली.

शिताफीने आरोपींना पकडले

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणावरून तसेच गोपनीय माहितीवरून पातूर परिसरातून दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणातील आरोपी विशाल सुरेश करवते (वय २८ वर्ष), अमोल सुरेश करवते (वय ३० वर्ष दोन्ही रा. निंबी ता. बार्शिटाकळी जि. अकोला) हे फरार होण्याच्या प्रयत्नात असतांना एलसीबीच्या पथकाने अत्यंत शिताफीने घेराव घालून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

बार्शीटाकळी येथील पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीवरून गुन्ह्यातील फरार आरोपी सुरेश हरिभाऊ करवते (वय ६० वर्ष), रेखा सुरेश करवते (वय ५२ वर्ष), अस्मीता विनोद सुरवाडे (वय २५ वर्ष), मयुरी अमोल करवत (वय २३ वर्ष सर्व रा. निंबी ता. बार्शिटाकळी जि. अकोला) यांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या नेतृत्वात पथकांनी ही कारवाई केली.