अकोला : भररस्त्यात पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शहरातील डाबकी रोड परिसरात रविवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळावर धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शहर चांगलेच हादरले असून हत्येचे सत्र कायम आहे.
नेमकं घडलं काय?
डाबकी रोडवर एका व्यक्तीने महिलेवर चाकुने वार करून गंभीर जखमी केल्याची माहिती राजेश साखरे यांनी ‘डायल ११२’वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस अंमलदार सचिन कोसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मंदा दीपक गुडदे (वय ४५ वर्ष) यांना तत्काळ उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. आरोपी दीपक गुडदे याला ताब्यात घेण्यात आले. पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांना माहिती मिळताच १० मिनिटांत घटनास्थळी दाखल होऊन उपस्थित नागरिकांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी पती अटकेत
जखमी महिला मंदा दीपक गुडदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी पती दीपक दगडु गुडदे (वय ५० वर्ष रा. कलोरी ता. खामगाव जि. बुलढाणा) याच्यावर कलम १०३ (१) भा.न्या.स. प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि अभिषेक अंधारे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक दीपक कोळी, सपोनी अभिषेक अंधारे, पोउपनि अनिल चव्हाण, एएसआय दीपक तायडे, पो.हवालदार उमेश पाटील, उमेश सुगंधी, देवेंद्र अवताळे, राजेश ठाकुर, सचिन कोसे, अजय शेळके आदींच्या पथकाने केली.
फसवणूक प्रकरणांत शिक्षा व दंड
बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला शिक्षा व दंड ठोठावला आहे. आरोपी संजय गोवर्धन ढगे याला कलम ४१९ भादंविमध्ये तीन महिने कारावास व एक हजार रुपये दंड, कलम ४६८ भादंविमध्ये तीन महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, कलम ४७१ भादंविमध्ये तीन महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये फिर्यादी तसेच इतर साक्षीदारांच्या साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.
