अकोला : माझ्याकडे का बघतोस? असे म्हणत वेगवेगळ्या धर्मातील तरुणांच्या दोन गटाने एकमेकांशी वाद घातला. वाद टोकाला गेल्याने एका तरुणाच्या पोटात चाकूने गंभीर वार करण्यात आले. त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. तणावाची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे वेगाने फिरवत तीन आरोपी तरुणांना गजाआड केले आहे. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.
वाद कशावरून झाला?
शहरातील डाबकी रोड परिसरात रात्री उशीरा शेख तनवीर शेख नासीर (वय १९ वर्षे, रा. भगतवाडी गल्ली क्रमांक ०७, डाबकी रोड, अकोला) हा व त्याचा मित्र शेख मविस अमन मो. आजम (रा. जोगळेकर प्लॉट, अकोला) हे धूम्रपान करीत होते. त्या ठिकाणी आरोपी अर्जुन नरेंद्र धनावत याने शेख मविस अमन मो. आजम याला माझ्याकडे का बघतोस? असे म्हणून वाद घातला. आरोपी व त्याच्या इतर दोन साथीदारांनी शेख तनवीर शेख नासीर व शेख मविस अमन मो. आजम यांना मारहाण केली. यावेळी शेख मविस याच्या पोटात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. या प्रकरणी कलम १०३, ११५(२), ३ (५) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.
आठ पोलीस पथकांनी घेतला शोध; सहा तासांत आरोपी गजाआड
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता व इतर दोन आरोपी निष्पन्न नसल्याने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात दाखल होऊन मार्गदर्शन केले. आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे एकूण आठ पथके तयार केले. तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे खदान येथील पोलीस पथकाने गुन्ह्यातील आरोपी अर्जुन नरेंद्र धनावत (वय २३ वर्ष रा. आश्वय नगर, डाबकी रोड, अकोला), अनिकेत संजय बाळापुर (वय १८ वर्ष रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला) व विशाल दिलीप सिरसोले (वय २३ वर्ष रा. गायत्री नगर, बाळापुर रोड, अकोला) यांना अवघ्या सहा तासांत अटक केली.
याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस निरीक्षक दीपक कोळी व त्यांच्या पथकाने केली.
