अकोला : जिल्ह्यात विशिष्ट कंपन्यांच्या सोयाबीन वाणाची उगवणक्षमता कमी असल्याचा प्रकार समोर आला. सदोष बियाण्यांची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून पेरणीनंतर सोयाबीन उगवलेच नाही, अशा असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या प्रकरणात शुक्रवारी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून त्यांचा कोंडण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांच्यासह शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

नेमकं प्रकरण काय?

यंदा मोसमी पावसाचे विलंबाने आगमन झाले. जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीला वेग आला. पेरणीनंतर सोयाबीन पिकाच्या काही विशिष्ट कंपन्यांच्या वाणांमध्ये उगवणक्षमता कमी असल्याच्या किंवा बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रमाणित बियाण्यांसंदर्भात सुद्धा तक्रारी आहेत. या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी माजी आमदार अमोल मिटकरींसह शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक दिली.

आंदोलकांची आक्रमक भूमिका

सदोष बियाणे विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात आपल्याला अधिकार नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावर आंदोलक अधिक आक्रमक झाले. त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकून त्यांना कोंडून ठेवले. त्यानंतर कार्यालयातच ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या समस्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. सदोष बियाणे, पीक नुकसान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप

अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे समोर आले. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. कृषी अधिकारी कुठल्याही प्रकारे सहकार्य करण्यास तयार नाही. त्या कंपन्या काळ्या यादीत टाकण्याची मागणी केल्यावर आम्हाला अधिकार नसल्याचे अधिकारी सांगतात. एकीकडे कृषिमंत्री अधिनियम विधिमंडळात वाचून दाखवतात, दुसरीकडे अधिकारी म्हणतात आमच्या हातात काही नाही. जिल्हा कृषी विभागाचे कंपन्यांसोबत साटेलोटे आहे, असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.