अकोला : डेंग्यू आजारामुळे अंतर्गत रक्तस्त्राव, अवयव निकामी होणे यासह मृत्यूचा देखील धोका आहे.राज्यात वर्षभरामध्ये १८ हजारांवर डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी २१ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यू नियंत्रणासाठी जनतेचा सहभाग आणि सहकार्य आवश्यक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली.

दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. राज्यात २०२४-२५ या वर्षात १८ हजार १६२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. जो संक्रमित एडिस एजिप्ती डासाच्या चाव्यामुळे पसरतो. हा आजार उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये सामान्य आहे आणि बहुतेकदा पावसाळ्यात आणि नंतर डासांच्या प्रजनन परिस्थिती अनुकूल असताना वाढतो.जून ते ऑक्टोबर हा काळ सर्वात जास्त प्रभावित राहतो. काही प्रदेशांमध्ये वर्षभर तुरळक प्रकरणे सुरूच राहतात.

हवामान बदल, शहरीकरण आणि सार्वजनिक आरोग्य प्रतिसादांमुळे विविध भागात डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार दिसून येतात. अचानक जास्त ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ आणि उलट्या, त्वचेवर पुरळ , सौम्य रक्तस्त्राव आदी डेंग्यूची लक्षणे आहेत.बहुतेक डेंग्यूचे रुग्ण सौम्य असतात. काही प्रकरणांमध्ये ते गंभीर डेंग्यूमध्ये बदलू शकतात. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव, अवयव निकामी होणे आणि मृत्यू देखील होऊ शकतो, असे डॉ. गाढवे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कीटकजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण

डास डेंग्यू विषाणूने संक्रमित व्यक्तीला चावतो, तेव्हा तो विषाणू डासात प्रवेश करतो. त्यानंतर तो संक्रमित डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास तो विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतो आणि संसर्ग निर्माण करतो. कीटकजन्य आजाराचे नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याकडून सर्वेक्षण करण्यात येते. आरोग्य शिक्षण दिले जाते. ताप रुग्णांचे रक्त नमुने व रक्त जल नमुने संकलन करून तपासणी करण्यात येते. डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे, त्यामुळे या आजाराबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यासह डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या आजाराला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ बळीराम गाढवे यांनी केले आहे.