अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला शहराच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान विरोधी पक्ष, शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. मुख्यमंत्री दौऱ्यावर येण्यापूर्वीच पोलिसांनी संभाव्य आंदोलकांना पोलीस ठाण्यात आणले. राज्यात लोकशाही अस्तित्वात नसून ही हुकूमशाही असल्याचा आरोप स्थानबद्ध केलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अकोला शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते विविध अडीच हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करतील. त्यानंतर ते अकोला क्रिकेट क्लब येथे आयोजित जाहीर विकास संवाद सभेला संबोधित करणार आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान विरोधी पक्ष व शेतकरी संघटनांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी अगोदरच त्यांच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी, किसान ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शरद वानखडे, त्यांचे इतर पदाधिकारी, राजेश मिश्रा यांच्यासह विविध विरोधी पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आज सकाळपासून ताब्यात घेतले. त्यांना शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहेत. या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा देखील अधिकार नसून राज्यात एक प्रकारे हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप स्थानबद्ध झालेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे निवडणूकपूर्व शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतून अप्रत्यक्षरित्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. या सभेसाठी अकोला जिल्हा भाजपने जोरदार तयारी केली. भाजप प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर, पालकमंत्री आकाश फुंडकर, खा.अनुप धोत्रे, आ. हरीश पिंपळे आ. प्रकाश भारसाकले, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, किशोर पाटील आदींसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सभेचे सुक्ष्म नियोजन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. विकास संवाद सभेच्या तयारीसाठी गेल्या १५ दिवसांपासून लोकप्रतिनिधी, नेत्यांसह पक्षाच्या ५२ आघाडीचे पदाधिकारी कामाला लागल्याचे चित्र होते. लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात विविध घटकांशी संवाद साधत १२७ सभा घेतल्या. समाजातील सर्व घटकांनी सभेत सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे.