अकोला : चारधाम यात्रेसाठी अकोल्यातून भाविकांचा जथ्था गेला आहे. यामध्ये सहभागी अकोला जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश केने यांना तीन दिवसांपूर्वी केदारनाथ येथे पहाट चढतांना डोलीमध्ये अचानक त्रास जाणवून प्रकृती बिघडली. त्यांना हरिद्वार येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून ते चारधाम यात्रेची आतूरतेने प्रतीक्षा करीत होते. यावर्षी ते चारधाम यात्रेसाठी गेले आणि तोच त्यांचा अखेरचा प्रवास ठरला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
इच्छापूर्ती, मात्र नियतीला वेगळेच मान्य होते
भाविकांचा एक मोठा जथ्था २५ मे रोजी अकोल्यावरून चारधाम यात्रेसाठी डॉ. माधव देशमुख यांच्या नेतृत्वात रवाना झाला. यामध्ये रमेश रामकृष्ण केने आपल्या पत्नी व इतर नातेवाईकांसह सहभागी झाले होते. चारधाम यात्रा करण्याची त्यांची गत अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती आता पूर्ण झाली होती. नियतीला मात्र वेगळेच मान्य होते.
हरिद्वार येथे उपचार, प्रकृतीत देखील सुधारणा, पण…
अकोल्यातील सर्व भाविकांसह त्यांनी यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दर्शन घेतले. चारधाम यात्रेदरम्यान ४ जून रोजी केदारनाथ येथे पहाड चढताना डोलीमध्ये रमेश केने यांना अचानक त्रासा जाणवला. त्यामुळे ते पत्नीसह वापस फाटा येथे परतले. काही काळ विश्रांती केल्यानंतर त्यांना बरे वाटले. त्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. पुढील उपचारासाठी रमेश केने यांना तत्काळ हरिद्वार येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा प्रतिक केने आणि जावई कृष्णा काळे हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. ६ जून रोजी अकोल्यातून गेलेल्या इतर भाविकांसोबत त्यांनी संवाद देखील साधला. मात्र, रविवारी उपचारादरम्यान रमेश केने यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव घेऊन कुटुंबीय अकोल्याकडे रुग्णवाहिकेने निघाले आहेत, अशी माहिती डॉ. माधव देशमुख यांनी दिली.
दर्शनाची आस अन् त्याच ठिकाणी शेवट
रमेश केने शांत, मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावाचे होते. चारधाम यात्रेत गंगा नदीच्या दर्शनाची आस मनाशी बाळगून ते गेले होते. त्याच गंगेच्या पवित्र तीरावर हरिद्वार येथे आज त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांचा हा शेवटचा प्रवास ठरेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते, अशी भावना डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.
