अकोला : अकोला बार असोसिएशनच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. चार जागांसाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी १३ ला मतदार होणार असून वकिलांमध्ये प्रचार केला जात आहे. निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

अकोला बार असोसिएशनचा वार्षिक निवडणूक कार्यक्रम ३१ जानेवारी रोजी जाहीर केला. २ ते ५ फेब्रुवारीपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष व सहसचिव पदासाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले. ५ फेब्रुवारीपर्यंत अध्यक्षपदासाठी एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

ॲड. संजय देशमुख, विद्यमान अध्यक्ष ॲड. हेमसिंग मोहता, ॲड. अजय वाघमारे यांचा समावेश आहे. उपाध्यक्ष पदासाठी तीन अर्ज दाखल झाले. ॲड. विजय भांबेरे, ॲड. सुमेध डोंगरदिवे, ॲड. राहुल वानखडे यांचा समावेश आहे. महिला उपाध्यक्ष पदासाठी ॲड. शितल गवई, ॲड. संगिता गावंडे, ॲड. शारदा मल्होत्रा, ॲड. निर्मला नागदेवे, ॲड. मंजू सावरकर यांनी, तर सहसचिव पदासाठी ॲड. पवनेश अग्रवाल, ॲड. आकाश भगत, ॲड. प्रमोद कोरडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती.

कोणत्याही उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने सर्व पदांसाठी अंतिम उमेदवारांची यादी अकोला बार असोसिएशनच्या मुख्य सुचना फलकावर प्रसिद्ध केली आहे. अकोला बार असोसिएशनची वार्षिक निवडणुकीमध्ये १३ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन बार सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजतापासून मत मोजणी केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. उदय पद्माकर नाईक यांनी दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. उदय नाईक यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय समिती स्थापन केली असून, त्यात ॲड. ए. जे. ठाकुर, ॲड. एस. एस. जोशी, ॲड. जी. डब्लु. पाठक, ॲड. ए. डी. देशपांडे, ॲड. एस. एम. खर्चे, ॲड. डी. एम. शुक्ला यांचा समावेश आहे.

१६०७ मतदार

अकोला बार असोसिएशनच्या सन २०२६-२७ वार्षिक निवडणुकीसाठी एकूण एक हजार ६०७ मतदार वकील आहेत. त्यामध्ये ३५४ महिला अधिवक्ता मतदार असून एक हजार २५३ पुरुष अधिवक्ता मतदार असल्याची माहिती देण्यात आली.