अकोला : शहरातील रामनगर येथील होमिओपॅथी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण श्यामसुंदर अग्रवाल याने उपचाराच्या नावाखाली नागपूर येथील तरुणी रुग्णासोबत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल ४६ वर्षीय डॉक्टराला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे या अगोदरही त्या डॉक्टरवर विनयभंगासह इतर गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
नेमकं घडल काय?
नागपूर येथील एक तरुणी उपचारासाठी अकोल्यात आली होती. ती डॉ. प्रवीण अग्रवाल याच्या दवाखान्यात गेली. सर्व रुग्ण गेल्यानंतर तीला चेंबरमध्ये बोलावण्यात आले. तपासणी आणि चेहऱ्यावरील केसांवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने तरुणीला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेले. यावेळी पीडित तरुणीसोबत त्याने अश्लील वर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी तरुणीने थेट सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे यांनी दिली.
यापूर्वी विनयभंगासह शिवीगाळ, मारहाणीचे गुन्हे
डॉ. प्रवीण अग्रवाल याच्यावर यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. २ मे २०२४ रोजी एका महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. विनयभंगासह मारहाण व शिवीगाळीचे गुन्हेही संबंधित डॉक्टरवर दाखल आहेत. त्यामुळे हा डॉक्टर की गुंड? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डॉक्टरी पेशाला काळिमा
रुग्णांसाठी डॉक्टर हे देवाचे रूप असतात. रुग्ण पूर्ण विश्वास ठेऊन डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात. मात्र, काही डॉक्टरांनी आपल्या गैरकृत्यातून या क्षेत्राच्या प्रतिमेला तडा दिला. अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. डॉ. प्रवीण अग्रवाल याने नागपूरवरून उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला. या अगोदर देखील त्याच्यावर विनयभंगासह विविध गुन्हे आहेत. तरीही त्याने पुन्हा गैरकृत्य केले. त्यामुळे समाजातून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
