अकोला : जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास यशाला गवसणी घालता येते. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील प्रज्ञा पुरणमल इंगळे ही तरुणी याचे आदर्श उदाहरण. मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या दाम्पत्याच्या कन्येने कष्टातून ‘वर्दी’ मिळवली. अतिशय सामान्य कुटुंबातील प्रज्ञाची इंडो तिबेटीयन सीमा पोलीस दलात नुकतीच निवड झाली. तिने प्रशिक्षण पूर्ण केले असून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
गत दोन-तीन वर्षांपासून प्रज्ञाने सैन्य दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
नियमित अभ्यास व तयारी केल्यावरही अनेक भरतीमध्ये अपयश आले. मात्र, त्यापुढे खचून न जाता मनात ‘फौजी’ होण्याची गाठ पक्की बांधली. सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. प्रज्ञा नियमित पहाटे पाच वाजता उठत व्यायाम करून भरतीची तयारी करीत होती. प्रज्ञाचे वडील गवंडी, मजुरीचे काम करतात, तर आई मोलमजुरी करते. प्रज्ञाचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत झाले. पुढील शिक्षण तिने शहरात घेतले. जिद्दीने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून अखेर प्रज्ञाची इंडो तिबेटीयन सीमा पोलीस दलात निवड झाली.
अत्यंत खडतर प्रशिक्षण देखील तिने पूर्ण केले. मेहनतीचे फळ अखेर प्रज्ञाला मिळाले. प्रज्ञाच्या या यशाबद्दल डोंगर गावासह संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आम्हा सर्वांना प्रज्ञाच्या या निवडीचा सार्थ अभिमान असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. गावकऱ्यांकडून प्रज्ञा इंगळे हिचा सत्कार करण्यात आला.
‘ऊर अभिमानाने भरून आला’
प्रज्ञाची इंडो तिबेटीयन सीमा पोलीस दलात निवडीने आम्ही खूप आनंदात आहोत. ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. प्रज्ञाला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. तिने यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. आज मुलीच्या कामगिरीने ऊर अभिमानाने भरुन आला, अशी भावना प्रज्ञाचे वडील पुरणमल इंगळे यांनी व्यक्त केली.
‘आई-वडिलांचं स्वप्न आज खरे ठरले’
माझ्या आई-वडिलांची पहिल्यापासून इच्छा होती की, मी सैन्य दलात नोकरी करून देश सेवा करावी. आई-वडिलांचं स्वप्न आज खरे ठरले आहे. मला मोठं करण्यात गुरुजनांचा, ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे. सुरक्षा दलात जाण्याचा विचार केल्यानंतर अविरत शारीरिक कसरत, परिश्रम व सातत्यपूर्ण सराव केला. यामुळेच यश मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा इंगळे हिने दिली.

