अकोला : ‘एल-निनो’चा गंभीर दुष्परिणाम झाला. त्याच्या प्रभावामुळे यंदा अपुरे पर्यन्यमान झाले. जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. दुष्काळाचे गंभीर संकट लक्षात घेता विविध व्यवसायांवर निर्बंध लादण्यात आले. या सर्वचा परिणाम रोजगारावर झाला. दैनंदिन रोजगारीवर कुटुंबियांच्या पोटाची खळगी भरणाऱ्या कामगारांसाठी रोजगारही दुरापास्त झाला आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकट अधिक गडद झाल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली.

यंदा पावसाचा मोठा खंड पडला. पावसाची मोठी तूट आहे. पावसाअभावी शेतातील पिके करपली. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुष्काळाच्या संकटामध्ये बळीराजा होरपळला असून खरीप हंगाम हातचा गेला. राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. दुष्काळाचा शेतीसह आता सर्वच क्षेत्रावर विपरित परिणाम दिसून येत आहे.

दुष्काळग्रस्त कृषी क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थाही संकटात

पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. दुष्काळामुळे बळीराजा होरपळून निघाला. पिके करपल्यामुळे हाती काहीच लागत नसून शेतकरी हतबल झाले आहेत. राज्याच्या बहुतांश भागातील अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. यंदा उत्पादन काहीच नसल्याने त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर जाणवू लागले आहेत. शेतातील पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांकडे येताच ते बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जाते. त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडे काहीच उत्पादन आले नसल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. दुष्काळाचा अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसल्याचे चित्र दिसून येते.

संपूर्ण प्रक्रिया अडचणीत

विदर्भात अर्थव्यवस्थेची साखळी प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून असते. यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे संपूर्ण कृषी क्षेत्रच कोलमडले. खरीप हंगामात पेरणी करून उत्पादनाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या पदरी घोर निराशा पडली. अर्थव्यवस्थेचा प्रमुख घडक असलेला शेतकरीच गंभीर आर्थिक संकटात सापडला. यंदा खरीप हंगाम मातीमोल झाल्याने पुढील संपूर्ण प्रक्रिया अडचणीत आली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची काढणी केली जाते. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र, यंदा सोयाबीन पिके उभी दिसत असली तरी त्याला शेंगा नाहीत. शेंगा असल्या तर त्यामध्ये दाणे नाहीत. उत्पादन २० ते २५ टक्क्यांवर आल्याचे काही ठिकाणच्या पीक कापणी प्रयोगातून समोर आले. अनेक शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन काढणे देखील परवडणारे नाही. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी उभ्या पिकावरून नांगर फिरवला. या सर्व गंभीर परिस्थितीत कामगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही.

रोजगार चक्र विस्कळीत

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात बळीराजा सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतो. त्याच्या वाहतूक व्यवस्थेतून अनेक वाहनधारकांना रोजगार मिळतो. हमीभावावर शासकीय खरेदी केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा खासगी व्यापाऱ्याकडे शेतकरी आपले उत्पादन विक्री करीत असतांना हमाल, कामगारांना मोठा रोजगार उपलब्ध होत असतो. कृषी उत्पादन विक्रीच्या प्रक्रियेमध्ये हॉटेलसह इतर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही विविध माध्यमातून उत्पन्न मिळते. दुष्काळामुळे यंदा उत्पादन नसल्यासारखेच आहे. त्यामुळे आवक एकदम रोडावली असून बाजारपेठेवर अवकळा आली. शेत मजूर, वाहतूकदार, हमाल, कामगार यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून छोटे-मोठे व्यावसायिक देखील आर्थिक संकटात आले आहेत. रोजगाराचे संपूर्ण चक्रच विस्कळीत झाले.

व्यावसायिक निर्बंधामुळे शहरी रोजगारही अडचणीत

यंदाच्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा चांगलीच होरपळ होत आहे. अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून तप्त उन्हामुळे बाष्पीभवन देखील होत आहे. जलसाठ्यात घट होत असल्याने शहरी भागात पाणी कपात केली. हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके बसू लागले. यावर खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक पाण्याच्या व्यावसायिक वापरावर बंदी आणली. कोणत्याही प्रकारच्या बांधकामासाठी महापालिकेच्या नळाच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई आहे. कार वॉशिंग सेटर, सर्विस सेंटर, हॉटेल, लॉज, मंगल कार्यालय, तरणतलाव आदीला बंदी घातली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल योग्य असले तरी रोजगाराच्या दृष्टीने मात्र ते मारक ठरत आहे.