अकोला : खरीप हंगामामध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा तुटवडा नोंदविण्यात आला आहे. सलग तीन ते चार आठवड्यांच्या पावसाच्या खंडामुळे जमिनीतील नैसर्गिक ओलावा घटला. मुख्य जलसाठा नाममात्र असून तो पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा रब्बी हंगाम आव्हानात्मक ठरणार असल्याने कालवे अथवा उपसा सिंचनावर अवलंबून न राहता उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर आधारित शास्त्रोक्त पीक नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला.
जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड महत्त्वाची
भारी खोल काळ्या जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहत असल्याने खोल मुळे जाणारी करडई, देशी कोरडवाहू हरभरा आणि जवस या पिकांची निवड करणे योग्य ठरेल. करडईसाठी १० ते १२ किलो, देशी कोरडवाहू हरभऱ्यासाठी ६५ ते ७० किलो आणि जवसासाठी २५ ते ३० किलो बियाणे प्रति हेक्टर वापर करावा लागेल. मध्यम काळ्या जमिनीत कमी कालावधीत येणारी व ताण सहन करणारी रब्बी ज्वारी व मोहरी, तसेच सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास चिया पिकाची लागवड करता येईल. हलकी व उथळ जमीन असल्यास आणि सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यास रब्बीची पेरणी करू नये, असा सल्ला देण्यात आला.
शून्य मशागतीसह तंत्रज्ञानांचा अवलंब आवश्यक
रब्बी पिकांची उत्पादकता टिकविण्यासाठी ‘झिरो टिलेज’ अर्थात शून्य मशागतीचा अवलंब गरजेचा आहे. सोयाबीन काढणीनंतर नांगरट न करता ‘झिरो टिल सीड कम फर्टीलायझर ड्रिल’च्या साह्याने उपलब्ध मूळ ओलाव्यावर थेट पेरणी करावी. पेरणी १५ ऑक्टोबरपूर्वी ५ ते ६ सेंटीमीटर खोलीवर ओलाव्याच्या थरात पूर्ण करावी. बियाण्यास थायरम + कार्बेन्डाझिम (३ ग्रॅम प्रति किलो) किंवा ट्रायकोडर्मा तसेच रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. उगवणीनंतर १५ ते २० दिवसांत विरळणी करून झाडांची संख्या २० टक्के कमी ठेवावी. पिकांमध्ये पाण्याचा ताण निर्माण होऊ नये यासाठी ओळींमध्ये भुशाचे आच्छादन करावे. पाण्याचा ताण जाणवल्यास पोटॅशियम नायट्रेट किंवा युरिया यांची फवारणी करावी. हरभरा पीक २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर शेंडे खुडण्याचे तंत्र अवलंबावे, अशा उपाययोजना सूचवल्या आहेत.
गहू, मका टाळाच
मर्यादित पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक पाण्याच्या पाळ्या लागणाऱ्या गहू व मका पिकांची लागवड टाळावे लागेल. पाण्याअभावी या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच मोकाट अथवा फ्लड सिंचन पूर्णपणे टाळून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा आणि पाण्याची उपलब्धता यांचा विचार करूनच रब्बी हंगामाचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले.
