अकोला : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा कमी पर्जन्यमान झाले. त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले असून भूजल पातळीत मोठी घट झाली. हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. दुष्काळाचा तरणतलावांना मोठा फटका बसला असून तत्काळ बंदीचे आदेश अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ‘ऑक्टोबर हिट’मध्ये पोहण्यासाठी थंडगार पाण्यात झेपावण्याला आला ‘ब्रेक’ लागला.

विहीर, कुपनलिका खोदण्यासह उपसा करण्यास बंदी

नवीन विहिरी, कुपनलिका खोदणे, जलप्रकल्पांमधून शेती व उद्योगांसाठी पाणी उपसा करणे, सार्वजनिक बांधकामांसाठी पाण्याचा वापर करणे याबरोबरच तरणतलाव सुरू ठेवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबत सुधारित आदेश लागू केला आहे. हा आदेश टंचाई कालावधी संपेपर्यंत संपूर्ण अकोला जिल्हा कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागांत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटरच्या परिघात कोणत्याही खासगी किंवा व्यावसायिक वापरासाठी नवीन विहीर अथवा कुपनलिका खोदण्यास पूर्ण बंदी असेल. पूर्वपरवानगीशिवाय खोदकाम केल्यास यंत्र आणि साहित्य जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

जलसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित

जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या शासकीय जलप्रकल्पांसह नदी, नाले आणि कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून  उद्योग, व्यावसायिक कारणांसाठी आणि शेती सिंचनासाठी पाणी उपसा करण्यास तत्काळ बंदी घालण्यात आली. उपलब्ध पाणी साठा केवळ पिण्यासाठी (टँकर भरणे, प्रादेशिक नळ योजना) आणि पशुधनासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

सर्व तरणतलाव तत्काळ बंद

सध्या ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा बसत आहे. तापमानाचा पारा ३८ अं.से.पर्यंत पोहोचला. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होते. या स्थितीत थंडगार पाण्यात पोहण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, कोरड्या दुष्काळामुळे त्यावर बंदी घालण्यात आली. जिल्हा, तालुका व ग्राम स्तरावरील सर्व तरणतलाव तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकामांसाठी (उदा. रस्ते व शासकीय बांधकामे) पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

…तर जप्तीसह फौजदारी कारवाई

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंत्राटदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) आणि महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ मधील कलमांनुसार कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच, त्यांचे पंप, पाईपलाईन आणि यंत्र यासारखी पाणी उपसा साधने जप्त केली जातील.