अकोला : बनावट कागदपत्रांवरून पाच कोटींच्या प्लॉटची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात घडला. वयोवृद्ध महिलेच्या नावावर असलेला हा प्लॉट विक्री करण्यासाठी खोटे नाव धारण करून दुसऱ्याचा महिलेला हजर केले होते. या फसवणूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन मुख्य आरोपींना अटक केली. या प्रकारचे गैरव्यवहार करणारी मोठी टोळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं घडलं काय?

शांता प्रकाश बाहेकर (वय ८४ वर्षे) यांच्या मालकीच्या मलकापूर येथील सर्वे नं. ८ मधील प्लॉट नं. २१ (क्षेत्रफळ ५०७५ चौ. फूट) हा बनावट कागदपत्रांद्वारे विक्री केल्याचा प्रकार घडला. संशयित आरोपींनी संगनमत करून एका महिलेला फिर्यादी शांता बाहेकर यांचे खोटे नाव धारण करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर उल्हासनगर व अकोला येथे बनावट कुलमुखत्यारपत्र तसेच खरेदीखत तयार करून प्लॉटच्या बाजार भावानुसार सुमारे पाच कोटी रुपयाची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना गुन्ह्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले. यासाठी स्वतंत्र पथक गठित करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. पथकाने गुप्त माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. राहुल अशोकराव जाधव (वय ४३ वर्षे, रा. नायगाव, जुने शहर, अकोला), प्रियांका लक्ष्मण पाटील उर्फ प्रियांका नागेश चव्हाण (वय ३० वर्षे, रा. सरस्वती नगर, रिंग रोड, अकोला) व आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण (वय ३० संतोष नगर मलकापूर) या तीन आरोपींना अटक केली आहे.

बनावट कागदपत्र तयार करण्यामागे कोणाचा सहभाग?

या फसवणुकीमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची माहिती आरोपींकडून मिळण्याची शक्यता आहे. बनावट कुळमुखत्यारपत्र व खरेदीखत तयार करण्यामागे नेमका कोणाचा सहभाग होता? दस्तऐवज तयार करण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली? या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत? याचा तपास केला जात आहे. न्यायालयाने आरोपींना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

मालमत्ता खरेदी-विक्री करतांना काळजी आवश्यक

मालमत्ता खरेदी विक्री करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. दस्तऐवज, कुलमुखत्यारपत्र आणि मालकी हक्काची कागदपत्रे यांची दुय्यम निबंधक कार्यालय किंवा कायदेशीर तज्ज्ञांकडून पूर्ण खात्री करून घ्यावी. संशयास्पद हालचाल किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.
….