अकोला : अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरू ठेवले असून, तेलानंतर आता गोड पदार्थांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अकोल्यातील मारवाडी ट्रेडर्स या आस्थापनेवर तपासणीदरम्यान तब्बल १२ हजार १५० किलो गुळाचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या या गुळाची किंमत १३ लाख ५० हजार रुपये असून, या कारवाईमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. ‘प्युअर नॅचरल’ दाव्यानेच नियमभंग केल्याने ही कारवाई करण्यात आली.
‘प्युअर नॅचरल’ दाव्यामुळे घोळ; भेसळीचा संशय
अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने अकोला बिजनेस सेंटर येथील मे. मारवाडी ट्रेडर्स या आस्थापनेची तपासणी केली. या तपासणीदरम्यान ‘प्युअर नॅचरल’ राजवाडी गुळाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. या गुळामध्ये भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, संबंधित अन्न पदार्थाच्या पॅकिंगवर ‘प्युअर नॅचरल’ असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे अन्न सुरक्षा व मानके (जाहिरात आणि दावे) विनियम, २०१८ मधील तरतुदींचे प्रथमदर्शनी उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आस्थापनेतील १२ हजार १५० किलो गुळाचा शिल्लक साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची एकूण किंमत १३ लाख ५० हजार रुपये आहे.
दावे आणि प्रत्यक्ष उत्पादनाची गुणवत्तात तफावत आढळली तर…
गुळाच्या नमुन्याचा प्रयोगशाळेतील विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. अन्न पदार्थांच्या पॅकिंगवर करण्यात येणारे दावे आणि प्रत्यक्ष उत्पादनाची गुणवत्ता यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असे अन्न प्रशासनाने स्पष्ट केले. ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न), अमरावती विभागाचे एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) देवानंद वीर यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली. गुळाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर या प्रकरणातील पुढील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे, असे सहाय्यक आयुक्त (अन्न) देवानंद वीर यांनी सांगितले. अनेक वेळा उत्पादकांकडून नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादन असल्याचा दावा केला जातो. त्यातून ग्राहकांची फसवणूक देखील होते. हे प्रकार टाळण्यासाठी अन्न प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली.
