अकोला : गुजरातमधून महाराष्ट्रात गोड पदार्थांची अस्वच्छ वातावरणात वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराविरोधात तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनने कारवाई करून लाखो रुपयांचा १९०० किलो गोड पदार्थांचा साठा सोमवारी दुपारी जप्त केला. या कारवाईने खळबळ उडाली असून तयार गोड पदार्थांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह लागले.

सणासुदीत गोड पदार्थांच्या मागणीत वाढ

सणासुदीचा काळ म्हटलं की खाण्यापिण्याची चंगळ. या सणाच्या काळात खासकरुन गोड पदार्थांचे महत्व खूप असते. वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ केले जातात. बाजारपेठेत अनेक प्रकारचे तयार गोड पदार्थ उपलब्ध असतात. गोड पदार्थांची मागणी सणासुदीत मोठ्या प्रमाणावर वाढते आणि मग सुरु होतो, भेसळीचा खेळ. भेसळयुक्त व अस्वच्छ, अनआरोग्यदायी गोड पदार्थ आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

नेमकं घडलं काय?

अकोला अन्न व औषध प्रशासनाना सोमवारी दुपारी रॅलीजीन परिसरात आरको ट्रॅन्स्पाेर्ट कंपनीमध्ये अहमदाबाद गुजरात येथून गोड पदार्थांचा साठा येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून छापा टाकला. तपासणी केली असता विविध ब्रँडचे स्वीट हलवा (अंबिका), ट्रॅडिशनल स्वीट, हलवा, रिच स्वीट (अंबिका), ब्रजनिधी स्वीट, मुरलीधर स्वीट आदींचा साठा अहमदाबाद गुजरात येथून दोन ट्रक (एमपी ०९ एच क्यू ५००४ आणि एमएच २८ एबी ७८८२) मधून अस्वछ आणि अनआरोग्यदायी पद्धतीने वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले.

साठा जप्त, व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाने अन्न पदार्थ्यांचे नियमित अन्न नमुने घेऊन उर्वरित पाच लाख ७२ हजारांचा १९०० किलो साठा जप्त केला आहे. तसेच यासंबंधी चौकशी केली असता हा माल मागवणारे व्यापारी कमल शर्मा, वैभव पाटील, अशोक अहुजा यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

साठा महापालिकेच्या प्रकल्पात नष्ट होणार

अन्न व औषध प्रशासनाने जप्त करण्यात आलेले अन्न पदार्थ हे अस्वच्छ वातावरणात वाहतूक केल्याने अकोला महानगर पालिकेच्या प्रकल्पात नष्ट करण्यात येणार आहेत. ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त देवानंद वीर आणि अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली. सध्या सणासुदीच्या काळात बनावट व भेसळयुक्त अन्न पदार्थ धोकादायक ठरू शकतात.