अकोला : जिल्ह्यातील हिवरखेड येथील मे. जय भोले किराणा शॉप या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. या तपासणीदरम्यान रिफाइंड सोयाबीन तेलात भेसळ असल्याचा संशय आल्याने तब्बल ३ हजार ६०० किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत ५ लाख ५० हजार ८०० रुपये असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तो जप्त केला आहे. अन्नसुरक्षेच्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याने संबंधित आस्थापनेचा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्न प्रशासनाने तेलाच्या भेसळी विरोधात मोहीम तीव्र केली आहे.

तेलाच्या साठ्यामध्ये भेसळीचा संशय

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हिवरखेड येथील मे. जय भोले किराणा शॉपची तपासणी केली. या वेळी रिफाइंड सोयाबीन तेलाचा नमुना प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आला. तपासणीदरम्यान तेलाच्या साठ्याबाबत भेसळीचा संशय निर्माण झाल्याने ३,६०० किलो तेल जप्त करण्यात आले. या तेलाच्या नमुन्याचा विश्लेषण अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.

प्रचंड अस्वच्छता साठवणुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष

तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनेत अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले. अन्नपदार्थांचा साठा वापरण्याच्या पद्धतीनुसार हाताळल्याची नोंद उपलब्ध नव्हती. स्वच्छतेच्या नोंदी नाहीत. कच्च्या अन्नपदार्थांच्या नोंदींचा अभाव, आवश्यक अभिलेख ठेवलेले नव्हते. कच्चे व तयार अन्नपदार्थ पॅलेटवर न ठेवता थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या बारीक जाळ्या खिडक्यांना लावलेल्या नव्हत्या. साठ्याची नोंद ठेवणारे स्टॉक रजिस्टर उपलब्ध नव्हते. या त्रुटी अन्नसुरक्षा व मानके नियमांतील शेड्यूल ४ च्या विविध तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या असल्याने प्रशासनाने संबंधित आस्थापनेचा परवाना तकाळ प्रभावाने निलंबित केला. मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावतीचे सहआयुक्त सचिन केदारे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) देवानंद वीर यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली.

सणासुदीत भेसळीचा मोठा धोका

दिवाळी सारख्या वर्षातील सर्वात मोठ्या सणानिमित्त विविध खाद्य पदार्थ, गोड पदार्थ याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. या मागणीची पूर्तता करण्यासाठी खाद्य पदार्थांमध्ये भेसळीचा धोका निर्माण होतो. अन्न पदार्थातील भेसळ टाळण्यासाठी प्रशासनाने कारवाईची विशेष मोहीम सुरू केली. कारवाईच्या सत्रामुळे उद्योजक व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.