अकोला : जिल्ह्यातील कसुरा मार्गावर बिबट्याचे शावक आढळून आले. अकोला वन विभागाने घटनास्थळावर धाव घेऊन त्या शावकाला ताब्यात घेतले. शावक व बिबट मादी आई वेगवेगळे झाल्याने ते व्याकूळ झाले. आता त्यांची भेट घडवून आणण्यासाठी वन विभागाची धडपड सुरू झाली. शावकाला पुन्हा घटनास्थळावर नेऊन रात्रभर बिबट आईची प्रतीक्षा करण्यात आली. मात्र, दुर्दैवाने शावक व त्याची आई बिबटची भेट घडून आली नाही. आज पुन्हा तो प्रयत्न केला जात आहे.
बाळापूर तालुक्यात बिबट्या व त्याचे चार शावक असल्याची चर्चा होती. निमकर्दा येथील सुभाष भास्कर खेडकर (वय ३८ वर्ष, रा. निमकर्दा) यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनपाल जी. पी. गायकवाड यांना बिबट्याच्या शावकाची माहिती दिली. कसुरा मार्गावरील गजानन महाराज मंदिराजवळ सुमारे १०० मीटर अंतरावर बिबट्याचे शावक आढळून आले.
बिबट्याच्या शावकाला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. अकोल्यातील सिंधी कॅम्प येथील वनपरिक्षेत्र कार्यालय (प्रा) येथे बिबट्याच्या शावकाला पिंजऱ्यामध्ये ठेवले. त्याला बाटलीतून दुध पाजण्यात आले आहे. वन अधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा वानखडे, पशुवैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार बिबट्याच्या शावकावर लक्ष ठेऊन आहेत.
दरम्यान, ते शावक व बिबट मादी आईची पुन्हा भेट घडवून आणण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे आहे. ते शावक व मादी बिबटला पुन्हा एकत्रित आणण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. शावकाला पिंजऱ्यात घेऊन वन विभागाचे पथक गुरूवारी रात्री घटनास्थळावर दाखल झाले. परिसरातच मादी बिबटचा संचार असल्याची माहिती आहे.
मात्र, शावक असलेल्या पिंजऱ्याच्या आसपास मादी बिबट आले नाही. त्या ठिकाणी माणसांचा वावर असल्याने कदाचित मादी बिबट आली नसावी, असा अंदाज आहे. आज पुन्हा वन विभागाचे पथक शावकाला घेऊन घटनास्थळासाठी रवाना झाले. त्या शावक व बिबट आईची पुन्हा भेट घडून येणार का? याकडे वन विभागासह वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागले आहे.
शावक व बिबटला एकत्रित आणण्याचे प्रयत्न
शावक व मादी बिबटला पुन्हा एकत्रित आणण्याचे प्रयत्न वन विभागाकडून उपवनसंरक्षक (प्रा) सुमंत एस. सोळंके, सहाय्यक वनसंरक्षक नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. काल रात्रभर त्या दृष्टीने प्रयत्न झाले. आज पुन्हा पथक त्या ठिकाणी दाखल झाले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) व्हि. आर. थोरात यांनी दिली.
