अकोला : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत १६.७९ कोटींचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांना अटक केली. या घटनेमुळे शहरातील ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. डाबकी रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

शहरातील गजानन नागरी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. १६ कोटी ७९ लाख २७ हजार ९३० रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात फिर्याद जिल्हा विशेष लेखा परीक्षक स्मिता प्रल्हाद जाधव यांनी दाखल केली. त्या तक्रारीनुसार, डाबकी मार्गावरील गजानन नागरी पतसंस्थेत ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारण्यात आल्या होत्या. मात्र, मुदत पूर्ण होऊनही ठेवीदारांना त्यांची ठेव रक्कम परत न करता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार डाबकी रोड पोलीस ठाण्यात कलम ३१६ (२), ३१६ (५), ३(५) भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र संरक्षण हित संबंधी अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार

तपासादरम्यान संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक मंडळाने ठेवीदारांचा विश्वास संपादन करून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदकिशोर नारायण अवारे (वय ५७ वर्षे, व्यवस्थापक, रा. गजानन नगर गल्ली नं. २, डाबकी रोड, अकोला) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने आरोपीला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरा आरोपी नारायण काशिराम अवारे याची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अहवालानुसार प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील चौकशी केली जाणार आहे.

सन २०२२ पासून चौकशी

या प्रकरणाची चौकशी सन २०२२ पासून सुरू होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत झालेल्या चौकशीत आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर स्वरूप उघडकीस आले. आतापर्यंत १८२ गुंतवणूकदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे व आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने केली.