अकोला : अपघातांच्या प्रमाणात गत नऊ महिन्यात १३.५१ टक्क्यांनी घट नोंदवल्या गेली. अकोला शहरात १ ऑगस्टपासून ‘हेल्मेट’ सक्ती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून अपघाती मृत्युच्या संख्या देखील कमी झाली. अपघाती मृत्यू कमी करण्यात ‘हेल्मेट’ सक्ती उपयुक्त ठरत असल्याचे अधोरेखित होते. ‘हेल्मेट’ सक्ती झुकारणाऱ्या २५ हजार वाहनधारकांना कारवाईचा दणका देण्यात आला आहे.
सप्टेंबरपर्यंत ३५२ अपघात
गत वर्षी सन २०२५ सप्टेंबरपर्यंत एकूण ४०७ अपघात घडले होते. सन २०२६ सप्टेंबरपर्यंत एकूण अपघात ३५२ झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत चालु वर्षी ५५ अपघातांनी घट झाली. त्याची टक्केवारी १३.५१ टक्के आहे. अकोला शहरात १ ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्याची अंमलबजावणी शहर वाहतूक शाखेकडून केली जात आहे. या काळात प्राणांतिक अपघात व अपघाती मृत्यूची संख्या कमी झाली.
४८ हजार ७२८ प्रकरणांमध्ये ३.८९ कोटीचा दंड
०१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मोटर वाहन प्रकरणांतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ६४९ प्रकरणात कारवाई केली. हेल्मेट सक्तीनंतरही ते प्ररिधान न करता वाहन चालवणाऱ्या २५ हजार २८५ वाहनधारकांना कारवाईचा दणका देण्यात आला. एकूण ४८ हजार ७२८ प्रकरणांमध्ये तीन कोटी ८९ लाख ७८ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.
अपघात कमी करण्यासाठी विशेष कृती आराखडा
सर्व पोलीस ठाण्यांना अपघात कमी करण्यासाठी विशेष कृती आराखडा देण्यात आला. प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन ठिकाणी दररोज सायंकाळी ६ ते रात्री २.०० वाजेपर्यंत विशेष सतर्क नाकाबंदी राबविण्यात येत आहे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी ‘रम्ब्लर स्ट्रीप’, ‘रोड मार्किग’, गतिरोधक, सूचना फलक, ‘ब्लिंकर’, ‘कॅट आईस’ आदी उपाययोजनांचा वापर केला. आधुनिक व सुरक्षित पद्धतीने वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेदरम्यान विनाक्रमांक पाटी, ट्रिपल सीट वाहनचालक, मद्यप्राशन करून वाहन चालविणारे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सात चोरीच्या दुचाकींचा शोध घेतला असून अवैधरित्या दुचाकीवर दारू वाहून नेणारे, गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली.
माहिती विश्लेषणातून उपाययोजना
जिल्ह्यात घडणाऱ्या सर्व अपघातांची माहिती डिजिटल पद्धतीने भरली जाते. ‘आयआरएडी’ मधील माहितीचे विश्लेषणाद्वारे रस्ते सुरक्षा तपासणी, धोकादायक ठिकाणांचे विश्लेषन करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात. अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानामध्ये काम केले जात आहे. रस्ते अपघातमुक्त जिल्हा करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, विशेष नाकाबंदी, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि उपाययोजना केली जात आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले.
