अकोला : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम स्थानिक व्यवसायावर झाला. गेल्या २० ते २२ दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा हॉटेल, केटरिंग व्यावसायिकांना बंद असल्याने त्यांची ‘गॅस कोंडी’ झाली. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या प्राधान्यक्रमात आता हॉटेल व्यावसायिकांचा सुद्धा राज्याच्या पुरवठा विभागाने समावेश केला. युद्धपूर्व स्थितीच्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांना २० टक्के वाटा मंजूर केला. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

२० ते २२ दिवस दिवस झाली अडचण

आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्याचा थेट परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला. यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मर्यादित झाला. त्याचा परिणामी हॉटेल, केटरिंग व इतर खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर होऊन मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अकोला शहरात सुमारे ५०० हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, केटरर्स व्यावसायिक आहेत. गेल्या २० ते २२ दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळाले नाही. काहींनी पर्याय शोधले. मात्र, त्याला देखील मर्यादा आहेत. या व्यवसायांच्या माध्यमातून सुमारे १२ ते १५ हजार आचारी, कामगारांना रोजगार मिळतो. लग्नसराई, धार्मिक उत्सवाच्या काळात व्यावसायिक सिलिंडरअभावी मोठी अडचण झाली.

अत्यावश्यक सेवांच्या प्राधान्यक्रमात हॉटेलचा समावेश

व्यावयायिक सिलिंडरच्या पुरवठ्यात राज्यातील पुरवठा विभागाने अत्यावश्यक सेवांसाठी प्राधान्यक्रम ठरवला. त्यामध्ये गेले तीन आठवडे हॉटेल व्यावसायाचा समावेश नव्हता. त्या कारणाने हॉटेलला व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद झाला. दरम्यान, हॉटेल व्यावसायिक संघटनांनी वारंवार सरकारकडे सिलिंडर पुरवठा करण्याची मागणी केली. त्यानंतर पुरवठा विभागाच्या सहसचिवांनी २ एप्रिलला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात प्राधान्यक्रमाचे क्षेत्र व वाटपाची टक्केवारी कळवली आहे. त्यामध्ये हॉटेल, धाबे, उपहारगृहे यांना २० टक्के पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत.  

व्यावसायिक सिलिंडरसाठी ‘या’ क्षेत्रांना प्राधान्यक्रम

प्राधान्यक्रम क्षेत्र व टक्केवारीमध्ये शैक्षणिक संस्था, रुग्णालये, स्मशानभूमी, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम यांना १०० टक्के, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाईवाहतूक, पोलीस, कारागृह कॅन्टीन यांना ७० टक्के याशिवाय ११ उद्योग व क्षेत्रांना ५० टक्के, तर त्या तुलनेत कमी महत्त्वाच्या इतर ११ उद्योग व क्षेत्रांना २० टक्के व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा केला जाणार आहे.

शासनाकडे सातत्यपूर्ण मागणी

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद असल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले होते. सासंदर्भात शासनाकडे वारंवार मागणी केली. त्यानंतर आता २० टक्के व्यावसायिक सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना देण्याचे पुरवठा विभागाने निर्देश दिले आहेत, असे अकोला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी सांगितले.