नागपूर : राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून रविवारी विदर्भातील अकोला हे शहर देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. अकोला शहरात रविवारी ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
विदर्भातील सर्वच शहरे तापलेली
मधल्या काळात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे वातावरणात बराच बदल झाला होता. मात्र, आता ढगाळ वातावरण दूर होताच तीन दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसने वाढला. रविवारी अकोला जिल्ह्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. त्यामुळे ते देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. अकोला पाठोपाठ अमरावती, वर्धा, वाशिम या शहरांतही पारा चांगलाच वाढला होता. ब्रम्हपुरी वगळता विदर्भातील सर्वच शहराने ४० अंश सेल्सिअस तापमान ओलांडले.
तापमान वाढतेच राहणार
हवामान खात्याने पुढील ८ ते १० दिवस वातावरण कोरडे व उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तापमानाचा पारा चढताच राहणार असून उन्हाच्या झळा बसणार आहेत. मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या, पण अवकाळी पावसाने हा पारा खाली आला. मात्र, आता पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतली आहे. तापमानात झपाट्याने वाढ होत असून आता हवामान खात्यानेही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
किमान तापमानातही वाढ
अकोला शहरात शनिवारी देखील ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मागील तीन दिवसात तापमानात चार अंशांनी वाढ झाल्याने अकोल्यात उकाडा वाढला आहे. गुरुवारी ३८.७ अंशावर तापमान पोहोचले होते. पण शुक्रवारी या तापमानात वाढ होऊन ते ४०.१ अंशांवर पोहोचले. तर शनिवारी ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.अमरावती येथे रविवारी ४२.४ अंश तापमानासह दुसऱ्या क्रमांकाची नोंद झाली आहे. किमान तापमानातही बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे. किमान तापमान देखील २७ अंशावर पोहचले आहे.
उकड्यामुळे नागरिक त्रस्त
तीव्र उन्हामुळे अकोल्यातील दैनंदिन जीवनावर परिणाम दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असून नागरिक शक्यतो घरातच राहणे पसंत करत आहेत. जवळपास सर्वच शहरांमध्ये सारखी स्थिती आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक प्रयत्न करताना दिसून येत आहे. उन्हामुळे चक्कर येणे, उलट्या होणे, डोकेदुखी आणि अंगात ताप येणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे दिसून येत आहेत. अशी लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सावलीत न्यावे.शरीर थंड ठेवावे आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
