नागपूर : अवकाळी पावसानंतर सूर्य नारायण चांगलाच कोपला आहे. कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी विदर्भातील अकोला शहरात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
वैदर्भीयांना उन्हाचे तीव्र चटके
विदर्भात सूर्याची किरणे प्रखर होऊ लागली असून खऱ्या अर्थाने विदर्भातील उन्हाळा तापू लागला आहे. उन्हाच्या लाटेमुळे रविवारपाठोपाठ सोमवारीही वैदर्भीयांना उन्हाचे तीव्र चटके बसले. अकोला ४३.८ अंशांसह लागोपाठ दुसऱ्या दिवशी देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. तर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी ४१.४ अंश तापमानाची नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील आठ दिवस उष्णलाटेचा इशारा दिल्याने उन्हाचा कहर आणखीन वाढणार आहे. सकाळी आठ-नऊ वाजतापासूनच उन्हाचे तीव्र चटके झोंबायला सुरुवात होते.
उन्हाची तीव्रता वाढतच आहे
सूर्य डोक्यावर येण्याआधीच उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. उष्णतेच्या लाटेने अवघा विदर्भ कवेत घेतला आहे. सोमवारी उन्हाचा सर्वाधिक तडाखा अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना बसला. अकोल्याच्या कमाल तापमानात जवळपास एका अंशाची वाढ होऊन पारा या मोसमातील उच्चांकी ४३.८ वर पोहोचला.
अकोल्याची सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद
‘एल डोराडो’ हे संकेत स्थळ जागतिक तापमानाची नोंद ठेवते आणि या संकेतस्थळावर अकोल्याची जगातील दुसरे ‘उष्ण’ शहर म्हणून नोंद करण्यात आली. असह्य ऊन व उकाड्याने वैदर्भीय कमालीचे त्रस्त झाले आहेत. हवामान विभागाचा आठ दिवस यलो अलर्ट असल्यामुळे या आठवड्यात पारा पंचेचाळिशी पार करण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्येच पारा ४४ पर्यंत पोहचला आहे, तर सर्वाधिक उन्हाच्या मे महिन्यात किती ऊन तापेल, याचा अंदाज घेऊनच धडकी भरली आहे. यंदाचा उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचा इशारा यापूर्वीच भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
‘या’ तीन शहरांचाही समावेश
जगातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि वर्ध्याचा समावेश आहे. अमरावती येथे ४३.२ अंश, यवतमाळ येथे ४३.२ अंश, वर्धा येथे ४३.१ अंश, वाशीम येथे ४२.६ अंश आणि गडचिरोली येथे ४२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर नागपूरत ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवारी अकोला ४३.८ यवतमाळ ४३.२ अमरावती ४३.२ वर्धा ४३.१ गडचिरोली ४२.० वाशीम ४२.६ बुलडाणा ४१.५ नागपूर ४१.४ चंद्रपूर ४१.४ भंडारा ४१.० ब्रह्मपुरी ४१.२ गोंदिया ४०.५ अंश सेल्सिअस अशी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.
