अकोला : अकोला महापालिका निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून भाजपमध्ये प्रचंड नाराजी नाट्य रंगले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी इच्छूक कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी एक इच्छूक महिला कार्यकर्ता भोवळ येऊन कोसळली. इच्छुकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या भाजपमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अकोला महापालिकेच्या २० प्रभागातील ८० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. राजकीय पक्षांसह इच्छूक ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत होते. सुरुवातीच्या सहा दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला नव्हता. सोमवारी अनेक इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. युती व आघाड्यांचे चित्र रात्री उशीरापर्यंत अस्पष्ट होते. महायुती करण्याच्या मुद्द्यावर नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच होते. जागा वाटपावर एकमत होत नसल्याने प्रचंड ओढाताण झाली. अधिकाधिक जागा पदरात पाडूण घेण्याचे नेत्यांचे प्रयत्न होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षांच्या नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित झाला आहे. अकोला महापालिकेच्या १४ जागा राष्ट्रवादी लढणार असल्याचे सांगण्यात आले. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे.

भाजपने उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करून अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कालपासून भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येत आहे. पक्षाने दिलेले उमेदवारांची नावे समोर येताच इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. भाजपने अनेक प्रस्थापितांचे तिकीट कापून नव्यांना संधी दिली. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी नाट्य रंगले आहे.

महापालिका निवडणूक लढण्यासाठी जोमाने तयारी करूनही ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीतूनच काही इच्छुकांनी थेट माजी महापौर विजय अग्रवाल यांचे निवासस्थान गाठले. त्या ठिकाणी काही इच्छुकांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी एक इच्छूक महिला भोवळ येऊन कोसळली. नाराज इच्छुकांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. या प्रकारामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. भाजपने निलंबित केलेल्या काही पदाधिकाऱ्यांना देखील परत पक्षात प्रवेश दिला आहे.