अकोला : अवैध सावकारी विरोधात सहकार विभागाने तीव्र मोहीम उघडली असून शहरात शुक्रवारी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तब्बल २२६ जणांच्या पथकाकडून २८ ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईमध्ये आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांनी दिली. आतापर्यंतची विभागातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली.
कारवाईमध्ये चार जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी
शहरात अवैध सावकारीविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासन व लेखा परिक्षण विभागातील एकूण १२० अधिकारी व कर्मचारी, ४० पंच, तसेच पोलीस विभागाचे २२ अधिकारी, ४४ महिला व पुरुष पोलीस कर्मचारी असे एकूण २२६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकांमार्फत एकूण ११ तक्रारदारांच्या दाखल केलेल्या तक्रारीवरून २८ ठिकाणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये छापे टाकण्यात आले.
‘या’ सावकारांकडे छापे
शहराच्या विविध भागातील गंगा सोनोने, पवन अग्रवाल, नवल अग्रवाल, अरविंद शुक्ला, कृष्णा झा, दर्शन अठराळे, राजुसिंग सुर्यवंशी, सागर बेलूरकर, विवेक अग्रवाल, रमेश सुरजुशे, आदेश पवित्रकार, अंजू संदीप लहरीया, घुसर येथील गोविंद बजाज, दिनेश राठी, गजानन सोनोने, जयप्रकाश मोटवानी, जयप्रकाश मोटवानी, सुनील उकंडे, राजेश शर्मा, चंद्रकांत गावंडे व आणखी, राजू शर्मा, अजय थावरानी, सोनल मेडीकर, डिंगाबर शिवलकर, धीरज श्रीवास, वैभव श्रीवास यांच्याकडे छापे टाकण्यात आले. झाडाझडतीमध्ये इसार पावती, धनादेश, मुद्रांक, खरेदी खत, डायऱ्या, ताबा व विक्री पावती, करारनामा, गहाण खत, सातबारा, रोकड वही, खाता वही आदी आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.
कागदपत्रांची पडताळणी व चौकशी
विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांच्या नेतृत्वातील पथकांनी केली. अमरावती जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार, बुलढाणा जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण, वाशीम जिल्हा उपनिबंधक एम. एस. लटपटे यांनी त्यांच्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी उपलब्ध करून दिले होते. कागदपत्रांची चौकशी व पडताळणी केल्यानंतर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अन्वये पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी स्पष्ट केले.
