अकोला : एका वृत्तवाहिनीचे पत्रकार कुंदन जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरात खदान परिसरात घडली. त्यांनी एवढे टोकाचे पाऊल का उलचलले? यामागे काही कारणे आहेत का? याचा तपास खदान पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.
नेमकी घटना काय?
शहरातील वाटुरकर लेआऊट येथील निवासस्थानी काल रात्रीच्या सुमारास कुंदन जाधव घरी एकटेच होते. पत्नी व मुली रुग्णालयात गेल्या होत्या. यावेळी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांचे वडील आणि पत्नी घरी परतल्यावर कुंदन जाधव हे गळफास घेतलल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती तत्काळ खदान पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणात खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. कुंदन जाधव यांच्या अचानक जाण्याने जाधव कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. त्यांच्या पार्थिवावर खदान मोक्षधाम येथे गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सहृदयी आणि मनमिळावू पत्रकार गमावल्याची भावना
कुंदन जाधव यांनी अकोल्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात अभ्यासू, निर्भीड, मनमोकळ्या आणि आपुलकीच्या स्वभावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाणे, सहकार्य करणे आणि इतरांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या अकाली निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक, राजकीय क्षेत्र सुन्न झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक सहृदयी आणि मनमिळावू पत्रकार गमावल्याची शोकसंवेदना अनेकांनी व्यक्त केली. कुंदन जाधव यांच्या पत्नी प्रियंका जाधव या देखील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.
दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले
पत्रकार जाधव यांना सहा वर्षीय अध्निता आणि एक वर्षीय कृष्णा या दोन मुली आहेत. कुंदन जाधव यांच्या अचानक जाण्यामुळे दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. या दुर्दैवी घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून परिसरात शोककळा पसरली आहे.
आत्महत्येच्या घटनेला पूर्ववादाची किनार?
पत्रकार कुंदन जाधव यांच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणाचा उलगडा अद्याप झालेला नाही. या घटनेमागे पत्रकारिता क्षेत्रातील पूर्ववादाची किनार असल्याची देखील शहरात चर्चा आहे. पोलीस तपासात नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे. खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती असून तपास सुरू असल्याचे खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी सांगितले.
