अकोला : एका कथित ‘लव स्टोरी’वरून शहरातील खदान पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांपुढे नवा पेच निर्माण झाल्याचा प्रकार घडला. विवाहिता आपल्या तीन वर्षीय चिमुकल्याला घेऊन तरुण प्रियकरासोबत घरून निघून गेली. पतीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी पती, पत्नी व त्या कथित प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. त्यानंतर प्रियकराने घुमजाव करीत महिलेला पतीकडेच जाण्यास सांगितले, तर विवाहितेने चिमुकल्याला पतीकडे सोडून प्रियकरासोबत जाण्यासाठी हट्ट धरला होता. या प्रसंगामुळे पोलीस देखील चक्रावून गेले.
नेमकं घडलं काय?
नेहमी गुन्हेगारीवरून चर्चेत असलेले पोलीस ठाणे आता प्रेम प्रकरणावरून प्रकाशझोतात आले आहे. पोलिसांपुढे पेचात टाकणारा प्रसंग उभा झाला. खदान पोलीस ठाण्यांतर्गत एक विवाहित महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन कथित प्रियकरासोबत घरातून निघून गेली होती. याची माहिती मिळताच पतीच्या पायाखालची वाळूच सरकली. पतीने खदान पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे वेगाने फिरवत विवाहिता, पती आणि त्या तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलीस चौकशीदरम्यान चक्रावणारा प्रकार समोर आला.
चिमुकल्याला पतीकडे सोडून विवाहितेचा प्रियकरासोबत जाण्याचा हट्ट
पोलिसांनी चौकशीमध्ये तिघांची बाजू ऐकून घेतली. विवाहितेने आपला तीन वर्षांचा मुलगा पतीकडे सोपवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मुलाला पतीने सांभाळावे. कथित प्रियकरासोबतच आपण जाणार असल्याचा हट्ट विवाहित महिलेने धरला होता. कथित प्रियकर तरुणाच्या प्रेमात आकांठ बुडालेल्या विवाहित महिलेची भूमिका ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
प्रियकराने तर भूमिकाच बदलली; म्हणाला, आता पतीकडेच जा!
पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान कथित प्रियकर तरुणाने आपल्या भूमिकेतच बदल केला. चिमुकल्या तीन वर्षीय मुलाला घेऊन विवाहितेने तरुणासोबत घर सोडले, त्याच तरुणाने नंतर मात्र घुमजाव केला. तरुणाने विवाहितेची समजूत काढत आपल्या पतीकडेच परत जाण्याचा सल्ला दिला. प्रियकराचे हे बोलणे ऐकून विवाहिता चांगलीच संतप्त झाली. कथित तरुण प्रियकर व विवाहितेमध्ये नव्या वादाला तोंड फुटले होते. एकीकडे विवाहिता प्रियकरासोबत जाण्यासाठी हट्ट करीत होती, तर दुसरीकडे प्रियकरच तिला पतीकडे परतण्यास सांगत होता. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरणावरून पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. यावरून चांगलीच चर्चा देखील रंगली.
