अकोला : विवाहितेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून २७ वर्षीय तरुणाची लोखंडी पाईप व टोकदार वस्तूने मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उरळ पोलीस ठाण्यांतर्गत खांबोरा गावात घडला. चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणास गावकऱ्यांनी मारहाण करून पकडून ठेवल्याचा बनाव आरोपींनी रचला होता. मात्र, पोलीस तपासात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
नीलेश श्रीकृष्ण तेलगोटे, रा. पाळोदी यांनी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये त्यांचा भाऊ शैलेश श्रीकृष्ण तेलगोटे (२७) याचे खांबोरा येथील माहेर तसेच शेगाव येथे सासर असलेल्या विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून विवाहितेचे नातेवाईक वासुदेव रामभाऊ भरणे व इतरांनी राग मनात धरून हत्या करण्यासाठी संगनमत केले. त्यानंतर शैलेश खांबोरा गावात गेला असता विवाहितेच्या वडिलांसह दोन भावांनी त्याच्या डोक्यात, हातावर गंभीर मारहाण करून त्याची हत्या केली. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३५१(२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी वासुदेव रामभाउ भरणे (वय ६० वर्ष), चेतन वासुदेव भरणे (वय ३२ वर्ष) व सचिण सारंगधर भरणे (वय ३७ वर्ष सर्व रा. खांबोरा) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींचा बनाव उघड
तरुणाला चोर समजून मारहाण केल्याचा बनाव आरोपींनी रचून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हत्येचा कोणताही पुरावा सोडला नव्हता. पोलिसांनी प्राथमिक माहितीवरून घटनास्थळाची पाहणी, परिस्थितीजन्य पुरावे, गोपनीय माहिती प्राप्त केली. मृतकाचे अंगावरील जखमांचे निरीक्षण तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
मृतकाची मुंबईला नोकरी, गावात आल्यावर विवाहितेची भेट
मृतक शैलेश तेलगोटे हा मुंबईत एका कंपनीत नोकरीला होता. गावात आल्यानंतर तो खांबोरा येथे विवाहितेला भेटण्यासाठी गेला असता त्याची हत्या करण्यात आली. विवाहितेला तीन वर्षांची मुलगी असल्याची माहिती आहे. विवाहिता व शैलेशचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात उरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
