अकोला : अकोला-खंडवा-रतलाम मीटर गेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. अकोला ते खंडवादरम्यान ३१९ कि.मी.चे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले. उर्वरित कामही जलदगतीने सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. या मार्गासाठी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी पाठपुरावा केला. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा हा रेल्वे मार्ग असून देशातील दहा राज्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

२००८ मध्ये ब्रॉडगेजला हिरवी झेंडी

उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा १४५० कि.मी.चा लांबीचा काचीगुडा-जयपूर हा रेल्वेमार्ग १९५६-५७ पासून अस्तित्वात होता. अत्यंत महत्त्वाच्या या मार्गाचे ब्रॉडगेज करण्याचा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात काचीगुडा ते पूर्णा व जयपूर ते रतलाम या मार्गाचे ब्रॉडगेज झाले. २०१० मध्ये अकोला ते पूर्णा हा रेल्वे मार्गही ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाला. दरम्यान, २००८ मध्ये अकोला-खंडवा-रतलाम या मार्गाच्या ब्रॉडगेजलाही हिरवी झेंडी मिळाली. ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्राचा मुख्य अडथळा होता. केंद्र सरकारने रेल्वे मार्ग पर्यायी मार्गाने करण्यास मंजुरी दिली.

४७३ कि.मी.पैकी ३१९ कि.मी.चे ब्रॉडगेज

अकोला ते रतलाम ४७३ कि.मी. लांबीच्या या मार्गापैकी रतलाम-पातालपाणी १४४ कि.मी. ओंकारेश्वर रोड-तुकाईथड १३२ कि.मी. आणि अकोला-अकोट ४३ कि.मी. असे एकूण ३१९ किमीचे ब्रॉडगेज पूर्ण झाले. उर्वरित कामासाठी जमीन संपादन, पूल आणि रेल्वेस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही पाच राज्ये थेट जोडली जातील. या मार्गामुळे गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा या दहा राज्यांतील प्रवाशांना लाभ होईल. विदर्भातून प्रवाशांना उत्तर व दक्षिण भारतात जाण्याची जलद सुविधा उपलब्ध होईल.

शेतकरी, व्यापारी व पर्यटकांना लाभ

या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांना त्यांचा कापूस, सोयाबीन, धान्य थेट मोठ्या बाजारपेठेत नेण्यास सुविधा होणार आहे. व्यापारी आणि उद्योगांना कच्चा माल व तयार मालाची स्वस्त वाहतूक करता येईल. तसेच ओंकारेश्वर, उज्जैन, इंदूरसारख्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जाणाऱ्या पर्यटक-भाविकांना मोठा लाभ होणार आहे. हा केवळ रेल्वे मार्ग नाही, तर विदर्भाच्या प्रगतीचा महामार्ग आहे. या प्रकल्पामुळे अकोला हे मध्य भारताचे महत्त्वाचे रेल्वेस्थानक बनेल, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.