अकोला : यंदा मोसमी पावसाला झालेल्या विलंबामुळे ५९ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे अकोला जिल्ह्यात ४१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. कापूस व सोयाबीन या परंपरागत पिकांकडेच शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

अपेक्षित क्षेत्रावर अद्यापही पेरणी अपूर्ण

यावर्षीच्या खरीप हंगामावर अस्थिर पावसाचे संकट आहे. त्यातच मोसमी पावसाच्या आगमनच उशिराने झाले. जून महिन्याचे पहिले दोन ते तीन आठवडे कोरडे गेले. बळीराजाच्या नजरा नभाकडे खिळल्या होत्या. त्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाचा जोर कायम राहिला. समाधानकारक पाऊस व जमिनीतील ओलावा लक्षात घेता शेतकऱ्यांनी वेगाने पेरणी सुरू केली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने पेरणीच्या कार्याला वेग आला. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतांना अपेक्षित क्षेत्रावर अद्यापही पेरणी पूर्ण झालेली नाही.

पेरणी योग्य क्षेत्र चार लाख ३२ हजार ०१० हेक्टर

अकोला जिल्ह्यात पेरणी योग्य क्षेत्र चार लाख ३२ हजार ०१० हेक्टर आहे. त्यातील एक लाख ७७ हजार ७५७.५४ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी पूर्ण झाली. एकूण क्षेत्राच्या ४१.१५ टक्के पेरणी झाली आहे. परंपरागत कापूस आणि सोयाबीन पिकांची अधिक पेरणी झाली. कापूस पिकाचे अपेक्षित क्षेत्र एक लाख २८ हजार ५९३ असून त्यापैकी ५८ हजार २१८.०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ४५.२७ आहे.

सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र

सोयाबीनचे नियोजित क्षेत्र दोन लाख ३६ हजार ४५९ हेक्टर असून त्यातील ९३ हजार ३२५.१ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. ३९.४७ टक्के सोयाबीनची पेरणी झाली. तुरीचे सरासरी क्षेत्र ५९ हजार ९८५ हेक्टर असून त्यातील २५ हजार ४४५.३७ हेक्टरवर म्हणजेचे ४२.४२ टक्के पेरणी करण्यात आली. मोठ्या क्षेत्रावर अद्यापही पेरणी बाकी असून त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन व कापसाचे आहे.

इतर पिकांची किरकोळ स्वरूपात पेरणी

खरीप ज्वारीची एक हजार ४०४ हेक्टरपैकी ४० हेक्टर, बाजरी एक हेक्टर, मका ४२.८, इतर तृणधान्य २२८.८, मुग २२०.३, उडीद २४१.१, इतर कडधान्य ३९, तीळ ११, इतर गळीत धान्य १७ व ऊसाची ११.८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आगामी काळात पेरणीला वेग येण्याची चिन्हे आहेत.