अकोला : हनुमान जयंतीनिमित्त भाविक भक्तांसाठी सर्वत्र महाप्रसाद आयोजित करण्यात येतो. अकोला जिल्ह्यात मात्र एक अनोखी महापंगत सर्वांचे लक्ष वेधून घेते. जिल्ह्यातील कोथळी बु. येथे गुरुवारी माकडांची शिस्तबद्ध पंगत बसली. वानरसेनेने रांगेत बसून स्टीलच्या ताटात प्रसाद ग्रहण केला. या अनोख्या महाप्रसादाची चांगलीच चर्चा होत आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरसेनेला मेजवानीच मिळाली.

आगळावेगळा महाप्रसाद; अनोखी पंगत

देश-विदेशात भाविकांकडून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दर्शनासाठी भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी उसळल्याचे चित्र आहे. सर्वच हनुमान मंदिरांमध्ये भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे. एका महाप्रसाद कार्यक्रमाची मात्र चांगलीच चर्चा होत आहे. हा महाप्रसादाचा कार्यक्रम आगळा-वेगळा ठरतो. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात कोथळी बु. येथे निसर्गरम्य व घनदाट वृक्षछायेखाली मुंगसाजी महाराज संस्थान आहे. या संस्थानमध्ये हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. केवळ भाविकांसाठीच नव्हे तर परिसरातील माकडांसाठी देखील महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले. एका रांगेत स्टीलच्या ताटामध्ये महाप्रसाद वाढण्यात आला. संस्थानचे पुजारी रामदास महाराजांनी परिसरातील माकडांना महाप्रसादासाठी निमंत्रित केले.

माकडांनी घेतला शिस्तबद्ध महाप्रसादाचा आस्वाद

परिसरातील सर्व माकडांनी येऊन शिस्तीमध्ये महाप्रसादाचा आस्वाद घेतला. माकडांना पुन्हा पदार्थ वाढण्यात येत होते. महाप्रसाद ग्रहण करून परिसरातील वानरसेवा तृप्त झाली. दरम्यान, बाजूलाच भाविकांच्या देखील पंगती उठल्या. या अनोख्या महाप्रसादाच्या पद्धतीची समाज माध्यमातून चांगलीच चर्चा होत आहे. ही पंगत शक्ती, भक्ती आणि भूतदयेचा अनोखा संगमच ठरत आहे. गत २० वर्षांपासून ही अनोखी परंपरा जोपासली जात आहे.

महापंगतीसाठी खास मेनू

मुंगसाजी महाराज संस्थान येथील रामदास महाराज शिंदे यांच्या पुढाकारातून दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी खास पंगत आयोजित केली जाते. या पंगतीत माकडांना आवडणारे चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिट्ट्या आणि विविध मिष्टान्न पदार्थ वाढले जातात. परिसरातील वानरसेना मोठ्या आवडीने या महापंगतीचा आस्वाद घेतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वानरसेना एका रांगेत बसून महाप्रसाद घेतात. या मंदिरावर पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठी श्रद्धा आहे. रामनवमी ते हनुमान जयंतीदरम्यान या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. हनुमान जयंती निमित्त येथे वानरसेनेची होणारी महापंगत सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. ही महापंगत बघण्यासाठी देखील नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी उसळते.