अकोला : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील घडामोडींना वेग आला आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केला. या संदर्भात राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने पत्र देण्यात आले आहे. लवकरच महापालिका निवडणुकीची धामधूम ही सुरू होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर ‘स्थानिक’ निवडणुका घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात आली. नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. राज्यातील २४६ नगर पालिका व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांसह सर्वपक्षीय मोर्चेबांधणी जोमाने केली जात आहे.
राजकीय घडामोडींना वेग आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या निवडणुका कधी लागतात? याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. अखेर आता स्थानिक निवडणुकांचा मुहूर्त निघाला. राज्यात नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतांनाच महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली.
महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने समक्रमांकाच्या ०४ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये दिलेला मतदार यादीचा कार्यक्रम पुन्हा सुधारित करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारुप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्याची दिनांक २० नोव्हेंबर आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना २७ नोव्हेंबरपर्यंत दाखल करता येईल.
प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून ५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांच्या ठिकाणी ८ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. हा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिकांच्या आयुक्तांना दिला आहे. आता महापालिका निवडणुकांच्या हालचालींना गती येण्याची चिन्हे आहेत. इच्छूक निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येते.
