अकोला : मराठमोळ्या अकोलेकर सुपुत्र अधिकाऱ्याने गुजरातमध्ये आपल्या कार्याची छाप सोडली. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागली.
गुजरातमध्ये आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे अकोलेकर आणि २००७ बॅचचे मराठमोळे आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची गुजरात राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. भारतीय निवडणूक आयोगाने ही नियुक्ती जाहीर केली.
गुजरात कॅडरचे अधिकारी असलेल्या सागळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच येणाऱ्या काळातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या नियुक्तीमुळे अकोल्यासह संपूर्ण राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मराठमोळ्या नागरिकांनी महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता देशातील विविध राज्यांमध्ये आपल्या यशाची कमान उंचावली आहे. त्यापैकीच एक उत्तम उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी संदीप सागळे. गुजरातमध्ये मतदार यादीची विशेष सुधारणा पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्त केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने २००७ च्या बॅचचे स्वच्छ प्रतिमेचे आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी दिली. संदीप सागळे यांनी यापूर्वी अहमदाबादचे जिल्हाधिकारी, तसेच बनासकांठा आणि भरूच सारख्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे.
सागळे यांनी काही काळ गांधीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले होते. प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी मतदार यादीच्या विशेष गहन सुधारणा प्रक्रियेचेही पर्यवेक्षण केले आहे. यापूर्वी ही जबाबदारी आयएएस अधिकारी हरित शुक्ला यांच्याकडे होती.
गुजरात राज्यातील निवडणुकांची मुख्य जबाबदारी
१६ नोव्हेंबर १९७३ रोजी जन्मलेले संदीप सागळे हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत. आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची गुजरात राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे. गुजरात राज्यात प्रमुख शहरांमध्ये लवकरच महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचीही प्रक्रिया सुरू होईल.
या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेचे संपूर्ण नियोजन, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शक अंमलबजावणी याची मोठी जबाबदारी सागळे यांच्यावर राहील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संदीप सागळे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात होईल. गुजरात राज्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असते.

