अकोला : अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ‘एआयएमआयएम’चे नगरसेवक तटस्थ राहिले. ऐनवेळी भूमिका बदलल्याने काँग्रेस आणि ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांमध्ये संघर्ष झाला. महापालिका सभागृहात काँग्रेस नगरसेवकांनी ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली.

अकोला महापालिकेत भाजप नेतृत्वातील ‘शहर सुधार आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल गोगे विजयी झाले. त्यांना ८० पैकी ४५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांना ३२ मते पडली. भाजपचे अपक्ष बंडखोर नगरसेवक आशिष पावित्रकर यांनी देखील भाजपच्या बाजूने मत दिले, तर ‘एआयएमआयएम’चे नगरसेवक तटस्थ राहिले. अकोला महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला आहे.

महापौर व उपमहापौरांची निवड करण्यासाठी आज महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी कामकाज पाहिले. महापौर पदासाठी तीन उमेदवारांनी एकूण पाच नामनिर्देशन पत्रे दाखल होती, तर उपमहापौर पदासाठी चार उमेदवारांनी एकूण पाच नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडकर व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुरेखा काळे व उपमहापौर पदासाठी भाजपचे अनिल गोगे व काँग्रेसचे आझाद खान अलीयार खान यांच्यात थेट लढत झाली. इतर उमेदवारांनी माघार घेतली.

या निवडणुकीत शहर सुधार आघाडीच्यावतीने भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी, तर उपमहापौरपदी अनिल गोगे ४५ नगरसेवकांची मते घेऊन विजयी झाले. शहर सुधार आघाडीतील भाजप ३८, राष्ट्रवादी शरद पवार गट तीन, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, महानगर विकास समिती प्रत्येकी एक आणि भाजप बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांची मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांना ३२ मते पडली. त्यामध्ये काँग्रेस २१, शिवसेना ठाकरे गट सहा आणि वंचित आघाडीच्या पाच नगरसेवकांचा समावेश आहे.

दरम्यान, ‘एआयएमआयएम’चे नगरसेवक भाजपविरोधी आघाडीत होते. विरोधी नगरसेवकांच्या बैठकीला त्यांची हजेरी होती. भाजपने शहर सुधार आघाडी स्थापन करून विरोधकांच्या प्रयत्न हाणून पाडले. तरीही काँग्रेसने बहुमत असल्याचा दावा कायम ठेवला. भाजप विरोधात लढा कायम ठेवण्याचे निश्चित केले. मात्र, महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ‘एआयएमआयएम’ने तटस्थ भूमिका घेऊन काँग्रेसला ऐन निवडणुकीत धक्का दिला. त्यामुळे काँग्रेस आणि ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांमध्ये वाद झाला.