अकोला : सध्याच्या धकाधकी आणि ताणतणावाच्या जीवनात शारीरिक आरोग्याएवढेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे आहे ते म्हणजे मानसिक आरोग्य (Mental Health). मे महिना हा जागतिक स्तरावर ‘मानसिक आरोग्य जागरूकता महिना’ (Mental Health Awareness Month) म्हणून पाळला जातो. या महिन्याचा मुख्य उद्देश मानसिक आजारांबद्दलची अनास्था, भीती आणि गैरसमज दूर करणे हा आहे.
मानसिक आरोग्याचे महत्त्व काय?
मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसिक आजार नसणे नव्हे, तर भावनिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सुस्थितीत असणे होय. शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत. तणावाचा थेट परिणाम शरीरावर होऊन हृदयविकार, मधुमेह यांसारखे आजार वाढू शकतात. मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तरच कामात लक्ष केंद्रित करू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो. सुदृढ मन नातेसंबंध आनंदी आणि स्थिर ठेवण्यास मदत करते. जागरूकतेची गरज भारतात आणि जगात नैराश्य (Depression), चिंता (Anxiety) आणि ताणतणावाचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे.
उपाय काय आहेत?
दुर्दैवाने मानसिक आजारांबाबत आजही समाजात गैरसमज आणि कमीपणाची भावना आहे. ज्यामुळे अनेक लोक मदत मागायला घाबरतात. “लोक काय म्हणतील?” या विचारापोटी अनेक जण उपचार टाळतात. यावर उपाय म्हणून मनातील भावना जवळच्या मित्र-मैत्रिणींशी किंवा कुटुंबाशी शेअर करा. दररोज ३० मिनिटे चालणे, योगासने किंवा ध्यान केल्याने मन शांत राहते. पौष्टिक आहार घ्या. सोशल मीडियाचा अतिवापर टाळा. दिवसातील काही वेळ स्क्रीनपासून दूर राहा. स्वतःसाठी वेळ काढा आणि आवडीचे काम करा. जर नैराश्य किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी टोल-फ्री क्रमांक १४४१६ (Tele-MANAS) उपलब्ध आहेत. या सेवा २४ तास आणि मोफत आहेत. महाराष्ट्रात मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी १०४ या क्रमांकावर संपर्क करून मदत मिळवता येऊ शकते. सर्व शासकीय आरोग्य संस्थेत समुपदेशन मोफत केले जाते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मानसिक आरोग्य मूलभूत अधिकार
मानसिक ताण, नैराश्य, चिंता, आत्मघाती विचार, परीक्षेचा ताण, नातेसंबंधातील समस्या किंवा व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन केले जाते. विशेष यामध्ये गोपनीयता राखली जाते. मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. या जागरूकतेच्या महिन्यात “मन शांत, समाज सशक्त” हे ब्रीदवाक्य जपून मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
