अकोला : राज्यात नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. तरीही चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराचा घटना थांबल्या नाहीत. अकोला जिल्ह्यात नराधम वृद्धाने चिमुकलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ६० वर्षीय वृद्धाने शेजारीच राहणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीवर चार ते पाच दिवस सातत्याने अत्याचार केला. या गंभीर प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पीडितेसह तिच्या कुटुंबाची आज भेट घेतली. एफआयआरला एवढा वेळ का झाला? असा सवाल करून पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे आ.पवार म्हणाले.
चिमुकलीवर वारंवार अत्याचार
चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात एका ६० वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करण्यासाठी गेल्यानंतर शेजारच्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अत्याचाराच्या प्रकारामुळे पीडित चिमुकलीच्या मनात भीती होती. तिने घडलेला प्रकार सुरुवातीलाच कुणालाच सांगितला नव्हता. मात्र, सातत्याने होणारा अत्याचार तिला असह्य झाला. अखेर काल पीडित मुलीने अत्याचाराचा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. तत्काळ चान्नी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल करण्यात आल्यावर आरोपी वृद्धावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके गठीत केली. आरोपींच्या शोधासाठी ते रवाना झाले आहेत.
आरोपीकडून धमक्या; पीडितेची वाईट अवस्था
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणावर आ. पवार म्हणाले, ‘‘फार वाईट पद्धतीने चिमुकलीवर अत्याचार झाले. ती मुलगी बोलू पण शकत नाही. त्या नराधम आरोपीने पीडिता व तिच्या कुटुंबाला जीवे मारून टाकेल, अडचणीत आणेल, अशा धमक्या दिल्या आहेत. ‘एफआयआर’ला एवढा उशीर का झाला? अत्याचार प्रकरणातील आरोपी फरार आहे. आज सायंकाळपर्यंत त्या नराधम आरोपीला पकडले गेले पाहिजे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा.’’
त्या आरोपीला घरून जेवण पुरवले जात असल्याची माहिती असून त्याच्या मुलाने सुद्धा याच प्रकारे अत्याचार केले होते, असे आरोप आ. पवार यांनी केले आहेत.
