अकोला : अकोला महापालिका क्षेत्रातील ४० खुले भूखंड गायब झाले आहेत. भूखंड माफियांकडून त्या जागा हडपण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेता आ. विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या प्रकरणांमध्ये वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील खुल्या जागांचा विषय काँग्रेस नेत्यांनी अधिवेशनात उपस्थित केल्याने भूखंड माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे. या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेता आ. विजय वडेट्टीवार यांनी अकोला शहरातील खुले भूखंड हडपण्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. शहरातील तब्बल ४० खुले भूखंड माफियांनी गिळकृंत केल्याचा आरोप त्यांनी केला.

खुल्या जागाच हरवल्या

राज्यात शहरांची वाट लागत आहे. अकोला शहरामध्ये ४० खुल्या जागा हरवल्या आहेत. प्रामुख्याने भागवत प्लॉटमध्ये खंडेलवाल मारूती शोरुमसाठी जागा दिली. ती जागा हडपली. जैन लॉननेही जागा घेतली. रस्त्यावर किंवा रस्त्याच्या लगत अतिक्रमण काढले जाते. मात्र, शहरातील खुले भूखंड गिळंकृत केले आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

चौकशी व्हायला नको?

सार्वजनिक उपयोगाच्या खुल्या जागा गिळंकृत होत असल्यास याची चौकशी व्हायला नको? असे प्रकार होत असल्यास शहर भकास होणार नाही का? कितीही निधी खर्च केला तरी शहरे सुंदर होऊ शकणार आहेत का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. ४० जागा हडपल्याचे हे गंभीर प्रकरण आहे. यामध्ये विशेष चौकशी आएएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

जमीन हडपणाऱ्यांची यादीच; नियम डावलून जागा घश्यात घातल्या

शीट क्र. २९ ए ही शासनाची जिनिंगची जागा होती, त्याबाबतही तेच घडले. किती लोकांची नावे घ्यावी, या जागा हडपणाऱ्यांची संपूर्ण यादीच माझ्याकडे आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. लोहिया नावाच्या व्यक्तीने शासन नियम डावलून ही जागा मोठ्या प्रमाणात हडपली आहे. याला महापालिकेतील कंत्राट कर्मचारी संदीप गावंडे व त्याच्या सोबतच्या अधिकाऱ्यांनी ही जागा अनधिकृत गुंठ्ठेवारी करून त्याच्या घशात घातली, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. अकोला शहरात खुले भूखंड हडपण्याची मोठी समस्या आहे. मात्र, त्यावर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.