अकोला : अकोला महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत सोमवारी प्रचंड गोंधळ उडाला. वंचित आघाडीचे स्वीकृत सदस्य बोलण्यासाठी आल्यावर सभागृहात ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्या गेल्या. त्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे महापौरांनी १६ सदस्यांना तीन सभांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले.

अर्थसंकल्पावर चर्चेसाठी सभा

अकोला महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून महापौर शारदा खेडकर, तर व्यासपीठावर आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अमोल गोगे उपस्थित होते. सभेमध्ये सन २०२५-२६ चे सुधारित व २०२६-२७ चे स्थायी समितीने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करून निर्णय घेण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

घोषणा होताच विरोधी नगरसेवक आक्रमक

सभागृहात चर्चा सुरू असतांनाच वंचित आघाडीचे स्वीकृत नगरसेवक सुनील इन्नानी बोलण्यासाठी उभे राहिले. त्याच वेळी सभागृहात ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यावर वंचित आघाडीसह काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. घोषणा देणाऱ्या संबंधित सदस्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. त्यामुळे सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी पीठासीन अधिकाऱ्यांपुढे जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले.

हे १६ सदस्य निलंबित

दरम्यान, सभागृहात असभ्य वर्तन करून नियमभंग केल्याचा ठपका ठेऊन महापौर शारदा खेडकर यांनी १६ सदस्यांना तीन सभांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यामध्ये विरोधी पक्ष नेते डॉ. झिशान हुसेन, वंचित आघाडीचे गटनेते नीलेश देव, पराग गवई, मो. फजुल, आझाद खान, शेख शमशू कमर शेख, विजय इंगळे, शंकर लंगोटे, निलोफर खान, आकाश कवडे, अभय खुमकर, जैना बी, आर्शिया परविन, उज्ज्वला पातोडे, सुवर्णरेखा जाधव आणि जयश्री बहाद्दुरकर या नगरसेवकांचा समावेश आहे.

सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

या आदेशानंतर विरोधी पक्षाचे नगरसेवक अधिक आक्रमक होत त्यांनी सभागृहात ठिय्या देऊन सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. सुरक्षारक्षक व पोलिसांना बोलावून निलंबित सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. सुमारे अर्धा तास रंगलेल्या या नाट्यानंतर अखेर घोषणाबाजी करीत निलंबित सदस्य सभागृहातून निघून गेले. सत्ताधाऱ्यांची दडपशाही असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला, तर विरोधी नगरसेवक कायम नियमभंग करीत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे.